Saturday 26 June, 2010

विचारी गाय

घाबरू नका! हा काही चित्रपट नाहिये. तसे मी गेल्या आठवड्यात Up in the Air आणि You don't Mess with Zohan हे चित्रपट बघितले. You don't Mess with Zohan म्हणजे आचरट कॉमेडी आहे. Up in the Air चांगला आहे. पण लिहावं असं काही वाटलं नाही. एक तर नुसतं लिहीणंच सोपं नाही त्यात चित्रपटांविषयी लिहिणं अजून कठीण आहे असं वाटतंय.
ब्लॉग लिहायला सुरूवात केली होती तेव्हा चित्रपट नाही तर सॉफ़्टवेअर तंत्रज्ञान यावर लिहिता येईल असं वाटलं होतं. त्यामुळे चित्रपट लिखाणाचं आवरल्यावर आता सॉफ़्टवेअरमध्ये काही जमतंय का हे बघूया असा विचार केला.
Cowsay किंवा Cowthink असे दोन सॉफ़्टवेअर प्रोग्रॅम आहेत. मुळात दोन्हीही प्रोग्रॅम एकच आहेत पण दोन वेगळी नावे आहेत. Fortune हा आणखी एक प्रोग्रॅम आहे. Fortune त्याच्या फाईलमधून प्रत्येकवेळी एक नविन वाक्य/विचार काढतो.
हे वाक्य Cowthink ला दिलं की विचार करणारी गाय तो प्रोग्रॅम तयार करतो. मी PHP वापरून फक्त हे दोन प्रोग्रॅम एकत्र केले आहेत आणि या पानावर दाखवले आहेत. Cowthink/say मुळामध्ये Perl मधे लिहिला आहे तो जर पूर्णपणे PHP मधे लिहिला तर त्याची कार्यक्षमता वाढेल आणि आंतरजालावर वापरायला सुटसुटीत होईल. तो प्रकल्प पुन्हा केव्हातरी.
आता या गाईच्या अनेक छटा आहेत. कधी दमलेली, कधी उत्साही, कधी मेलेली (बिचारी गाय!). सध्या ती stoned आहे. ;-) या पानाच्या उजव्या कोपर्‍यात विचारी गाय आहे. ती दिसत नसेल तर एवढं सगळं लिहिलेलं व्यर्थ आहे. आणि मी जादूगार पी सी सरकारसारख्या वस्तू पक्षी म्हणजे इथे गाय गायब करू शकतो हे सिद्ध होईल.
आता त्या गाईमुळे आणि तिच्या विचारांमुळे जर तुमच्या भावना दुखावत असतील तुम्हीही stoned व्हा!
तो PHP प्रोग्रॅम इतका लहान आहे की तो मुक्त उपलब्ध करण्याचा काही उपयोग नाहिये. तुम्हाला अशी गाय हवी असेल तर सांगा. आमचे येथे सर्व प्रकारच्या गाई मोफ़त बनवून मिळतील!
टीप: काही अपरिहार्य कारणांमुळे विचारी गाय सध्या विचार करत नाही आहे. पण शक्य तितक्या लवकर तिला पुन्हा विचार करण्यास प्रवृत्त करण्यात येईल.

Saturday 12 June, 2010

मांजा आणि ट्रेड

नुकताच मी सुहासने सांगितलं म्हणून राही अनिल बर्वे दिग्दर्शित ’मांजा’ हा लघुपट बघितला. तो बघून मला मी आधी बघितलेल्या स्पॅनिश-ईंग्रजी ’ट्रेड’ या चित्रपटाची आठवण झाली. खरं तर कुठल्याही दोन कलाकृतींची तुलना अयोग्य आहे. तो कलाकारांवर अन्याय आहे. पण माझा नाईलाज आहे. दोन्ही चित्रपटांविषयी एकाच लेखात लिहील्यामुळे थोड्याफ़ार प्रमाणात तुलना होणं अपरिहार्य आहे. पण तो माझा हेतू नाही. रसिकांनी दोन्ही चित्रपट बघावे आणि आपलं मत बनवावं.
दोन्ही चित्रपटांमध्ये कथेमध्ये काही साम्यस्थळे आहेत. दोन्हीही चित्रपटांमध्ये एक बहीण-भाऊ हे मुख्य भूमिकेमध्ये आहेत आणि बालकांचे लैंगिक शोषण हा विषय आहे. ट्रेडमध्ये लैंगिक शोषणाबरोबरच मानवी तस्करी (human trafficking) हा मुख्य विषय आहे.
दोन्हीही चित्रपट मी एकदाच बघितले आणि मला वाटत नाही की मी पुन्हा बघायचं ’धाडस’ करेन. दोन्हीही चित्रपट चांगले आहेत पण ते एवढे, hard hitting आहेत की पुन्हा बघायची ईच्छा होत नाही. ट्रेड मी कधितरी जवळ्जवळ २ वर्षंपूर्वी हॉस्टेलवर रात्री बघितला होता, त्या रात्री मी झोपू शकलो नाही. त्यानंतर पुन्हा बघायची ईच्छा नाही. त्यामुळे त्या चित्रपटाबाबत तपशीलांत थोडया चुका असू शकतात.
मांजा ४० मिनीटांचा लघुपट आहे. खरं तर कथा १-२ दिवसांत घडलेली आहे पण ती नॉन-लिनीअर पद्धतीने मांडली आहे. बहीण-भाऊ आणि एक पिसाट हवालदार यांची कथा. कथा काय असणार याची कल्पना आधीच येते आणि ती बरीचशी तशीच आहे. त्यामुळे सादरीकरण हाच महत्त्वाचा भाग. चित्रपट कृष्णधवल आहे. परत त्यातही जास्त गडद केलेला आहे. संवादामध्ये शिव्यांचा वापर प्रमाणाबाहेर झाला आहे. थोडक्यात चित्रपट वास्तववादी बनवण्याचा प्रयत्न जरा अती झाला आहे. त्यामुळे तो उलट फिल्मी वाटतो. अर्थात हे माझं वयक्तिक मत आहे. काही लोकांना तो खूपच वास्तववादी वाटला आहे. पण तरिही चित्रपट जरूर बघावा. सिनेमॅटोग्राफी जबरदस्त आहे.

ट्रेड हा २००७ मधला स्पॅनिश-ईंग्रजी चित्रपट आहे. हा चित्रपट न्यूयॉर्क टाईम्समध्ये आलेल्या लेखावर आधारित आहे. मुख्य घटना मेक्सिको आणि अमेरिकेतील टेक्सास प्रांतामधे घडतात. होर्जे आणि त्याची बहिण आद्रियाना यांची गोष्ट.

१७ वर्षांचा होर्जे लॅटिन मुलींचे ’फोटो’ दाखवून पर्यटकांना लुटण्याचं काम करत असतो. मानवी तस्करी करणारी एक टोळी आद्रियानाला पळवून नेते. अमेरिकेत विकण्यासाठी. मॉडेल बनवण्याचं अमिष दाखवून पूर्व युरोपमधून तरुण मुलींना गैरमार्गाने मेक्सिको मध्ये आणून जबरद्स्तीने वेश्याव्यवसायात ढकलायचं असाही या मल्टी-नॅशनल टोळीचा व्यवसाय असतो. वेरोनिका नावाची पोलिश तरूणी या जाळ्यात सापडते. संपूर्ण गोष्टीचा विचार केला तर सुरुवातीच्या थोड्या वेळानंतर गोष्ट काय असणार याचा अंदाज येतो. पण तरिही त्यातले अनेक प्रसंग, त्यातील संवाद आणि अभिनयामुळे प्रचंड परिणामकारक होतात, कायम लक्षात रहातात. आद्रियाना आणि वेरोनिकामधील प्रसंग, टोळीतील गुंड आणि वेरोनिकामधील संवाद, अमेरिकी पोलिस रे शेरिडन आणि हॉर्जे यांच्यामधील संवाद परिणामकारक आहेत. रे शेरिडनच्या उपकथानकामुळे मुख्य कथेमध्ये अनेक
रहस्य निर्माण होतात. त्यातील काही रहस्यांचा उलगडा चित्रपट संपला तरीही होत नाही. आणि त्यातील वेगवेगळ्या शक्यतांचा विचार करून वेड लागायची वेळ येते. रे शेरिडन साकरणार्‍या केविन क्लाईन, वेरोनिकाची भूमिका साकारणार्‍या अलिचा बचेल्दा(Alicja Bachleda) यांच काम लक्षात राहतं. सेझार रामोस (Cesar Ramos) याचं हे बहुतेक पहिलंच काम, तरिही त्याने साकारलेला हॉर्जे जबरदस्त आहे. चित्रपटाची पटकथा मोटरसायकल डायरीवाल्या होसे रिवेराची आहे.
नक्की बघाच.

Monday 7 June, 2010

The Edge of Heaven (Auf der anderen Seite)

फतिह अकिन या जर्मन-तुर्की दिग्दर्शकाचा हा जर्मन-तुर्की चित्रपट. जर्मनी मधे अधिकृत आणि अनधिकृत मिळून बरेच तुर्की लोकं रहातात. तुर्की समुदाय हा जर्मनीमधे सगळ्यात मोठा अल्पसंख्य समुदाय आहे. त्यांची संख्या इतकी आहे की मागे जर्मनीच्या चॅन्सेलर ऍंजेला मर्केलनी तुर्की लोकांनी जर्मनीत रहाताना जर्मन संस्कृती आणि भाषेचा सन्मान करायला हवा असं म्हटल्याचं आठवतं.
Auf der anderen Seite चा शब्दश: अर्थ ’दूसर्‍या बाजूला’(On the Other Side) असा होतो पण इंग्लंड-अमेरीकेमध्ये त्याचं प्रदर्शन The Edge of Heaven या नावाने झालं होतं. तेरेंतिनोच्या पेटंट असलेल्या धाटणीने, वेगवेगळी कथासुत्रे एकत्र बांधून चित्रपट बनतो. Yeter's Death, Lotta's Death आणि The Edge of Heaven अशी तीन कथासुत्रं आहेत. ही कथा एक बाप-मुलगा यांची जोडी आणि दोन आई-मुली यांच्या जोड्या यांची.
Yeter's Death:
जर्मनीमध्ये रहाणारा तुर्की वंशाचा, शहरी गुळगुळीतपणा नसणारा बाप म्हणजे अली अक्सू, त्याचा जर्मन भाषेचा प्राध्यापक असलेला मुलगा, नेजात अक्सू आणि तुर्की असलेली पण जर्मनीमधे वेश्या व्यवसाय करणारी येतेर यांची गोष्ट Yeter's Death मधे येते.
Lotta's Death:
येतरची मुलगी, अयेतन ही डाव्या विचारांच्या क्रांतीकारी संघटनेची कार्यकर्ती आहे. ती पोलिस पकडतिल या भीतीने, बनावट पासपोर्टवर गुल नावाने आईच्या शोधात जार्मनीमधे येते. तिथे शार्लोट उर्फ़ लोटा या जर्मन मुलीची आणि अयतनची मैत्री होते. पुढे शार्लोटचा मृत्यू होतो आणि सुझान म्हणजे शार्लोटची आई, शार्लोटची ईच्छा पूर्ण करायचं ठरवते.
The Edge of Heaven
सुझान शार्लोटची ईछा पूरी करते का, अलीचं पुढे काय होतं, नेजातला अयतन भेटते का, नेजात अलीला माफ़ करतो का वगैरे अनेक गोष्टी या भागात येतात.

कथा तीन वेगवेगळ्या भागात असली तरी, खूप काही नॉन-लिनिअर नाही. अनेक प्रश्न पडतात, काहींची उत्तरे मिळतात, काही मुद्दामच अपूर्ण सोडलेल्या आहेत. कथेचे काही भाग अपूर्ण सोडलेले असले तरी कथा खूप काही अमूर्त (abstract) किंवा अनाकलनीय नाही.
कथेचा पहिला भाग झाल्यावर, कथा "नेहमीचचं" अनपेक्षित वळण घेणार असं वाटतं पण पुढे कथा ख्ररंच अनपेक्षित वळण घेते. शेवट पुन्हा अपेक्षित होणार असं वाटत असतानाच पुन्हा आकस्मिकपणे चित्रपटाचा वेगळा शेवट होतो.
चित्रपटामधे ६ मुख्य कलाकार आहेत आणि सगळ्यांचीच कामे छान आहेत तरिही सगळ्यात लक्षात रहाणारं काम आहे ते अयतन साकारणार्‍या नुरगुल येसिलिकायचं.
एकूणात काय तर एकदा बघायला हरकत नाही.

Saturday 5 June, 2010

The Motorcycle Diaries (Diarios de Motocicleta)

The Motorcycle Diaries मूळ स्पॅनिश नाव (Diarios de Motocicleta) हा आणखी एक उत्तम चित्रपट. बॉसच्या तोंडून लॅबमधे कधीतरी हे नाव ऐकलं होतं. तेव्हा मी त्याचा ’Zen and The Art of Motorcycle Maintenance’शी काहितरी संबंध जोडून टाकला होता. तेव्हा मला दोन्हीविषयी काहिही महिती नव्हती.
मी आमच्या "जगप्रसिद्ध आणि ऐतिहासिक" लडाख दौर्‍यानंतर आलेल्या हॅंगओव्हर मधे कधितरी हॉस्टेलच्या खोलीत हा चित्रपट बघितला होता. त्यामुळे त्यातील प्रत्येक गोष्ट मला आमच्या लडाख दौर्‍यासारखीच वाटत होती. त्यामुळे कदाचित हा चित्रपट मला खूप आवडला असावा.
मी चित्रपट बघितला तेव्हा मला चे गेव्हाराविषायी काहिही माहित नव्हतं. ते त्याचं टी-शर्टवरचं प्रसिद्ध चित्रही मी कधी बघितलं नव्ह्तं. त्यामुळे कसलाही पूर्वग्रह नव्हता. त्यामुळे चित्रपट एकदम नविन आणि ताजा वाटला होता. पुढे मी तो बरेच वेळा बघितला. वास्तुपुरूषसारखाच हाही चित्रपट मी कुठूनही सुरू करून बघायचो.
अर्नेस्टो गेव्हारा दे ला सेर्ना (Ernesto Guevara De La Serna) आणि अल्बर्टो ग्रॅनादो (Alberto Granado), वय अनुक्रमे २३ आणि २९ वर्षे, यांनी दक्षिण अमेरिकेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मोटरसायकल वरून केलेल्या सफ़रीची ही अद्भूत गोष्ट.
चित्रपटाची सुरुवातच,"This is not the tale of impressive deeds. Is a piece of two lives taken in a moment when they were cruising together along a given path with same identity of aspirations and dreams." या फ्रेमने होते. त्यातील साधा सरळ प्रामाणिकपणा भावतो. ४ महिन्यात ८००० किमीची सफ़र पूर्ण करण्याची मूळ योजना आणि ती पूर्ण करण्याचा मार्ग "improvisation". हे improvisation एकदम अफ़लातून आहे. त्याची सुरूवातच रस्ता ठरवताना दिसते. अल्बर्टो स्केचपेनने नकाशावर काहितरी एक रेषा काढतो आणि हा रस्ता धरायचा असं ठरवतो. त्यांची ती ’La Poderosa' (The mighty one) मोटरसायकल आणि त्यावर लादलेलं सामान त्यांचे ते कपडे सगळयातच एक बेफिकीरी दिसते. ते बघून फार मजा वाटते. La Poderosa च्या रूपाने मला चालणारी नॉर्टन मोटरसायकल बघायला मिळाली.
त्या दोघांच्या प्रवासाचं चित्रण तर अफ़लातून आहे. एक तर मूळात तो प्रदेश फ़ार सुंदर आहे. अर्जेंटिनामधला गवताळ प्रदेश (पंपा प्रदेश), अँडिज पर्वतरांगा प्रेक्षणिय आहे. चित्रपटामधे सिनेमॅटोग्राफीमुळे ते अजून सुंदर दिसतं आणि अर्नेस्टो आणि अल्बर्टो यांचे संवाद आणि अभिनय त्यातलं नाट्य त्या सौंदर्यामध्ये अजून भर टाकतं. चित्रपटामधे एक विलक्षण दृश्य आहे. १०-१५ सेकंदांचं असेल, कॅमेरा पूर्ण स्थिर आहे. फ़्रेममध्ये फ़क्त गवताळ प्रदेश आहे. त्यातच मधून एक रस्ता आहे जो दिसत नाही फ़क्त मोटरसायकल गेल्यामुळे उडालेल्या धुळीच्या लोटामुळे जाणवतो. आपण फ़क्त अवाक होऊन बघत रहातो.

अर्नेस्टोची प्रेयसी, चिचिना, सुंदर आहे तिला बघताना, याला तिला सोडून प्रवासाला निघण्याची अवदसा का आठवली असाच प्रश्न पडेल!
प्रवासातील अनेक लहान-मोठे अपघात, पार्टीमधील स्पॅनिश गाणे, ती गाणारी स्त्री, दुसर्‍या एका स्त्री बरोबर नाचतानाचा प्रसंग मजेशीर आहेत. त्याचबरोबर चिलीमधील आदिवासींचे दारिद्र्य, पैसे नसल्यामुळे औषध-पाण्याशिवाय जगणारी आजीबाई, अटाकामामधल्या खाणींमधील मजूरांची परिस्थिती, पेरूमधील मूलनिवासींची हलाखीची स्थिती, संपन्न इंका साम्राज्याची स्पॅनिश आक्रमकांनी केलेली धूळधाण मन विषण्ण करते. इंकांच्या राजवटीतल्या ईमारतींचेच चर्चमधे केलेले रूपांतर आणि चर्चमधील प्रार्थनेला न आल्यामुळे महारोग्यांना ख्रिस्ती मिशनर्‍यांनी दिलेली सापत्न वागणूक अस्वस्थ करते. ईथे "Before he changed the world the world changed him." ही सिनेमाची टॅगलाईन एकदम चपखल आहे हे जाणवतं.
चित्रपटातील मुख्य अभिनेते म्हणजे, गाएल गार्सिया बर्नाल (Gael García Bernal) (अर्नेस्टो ’चे’ गेव्हारा) आणि रॉड्रिगो दे ला सेर्ना (Rodrigo De la Serna) (अल्बर्टो ग्रॅनादो) यांचा अभिनय उत्तम आहे. गाएल गार्सिया बर्नाल हा स्पॅनिश चित्रपटांमधला टॉम हॅंक्स आहे. त्याच्या ईतर चित्रपटांविषयी पुन्हा केव्हातरी. दिग्दर्शक वॉल्टर सालेस (Walter Salles) आणि होसे रिवेरा (Jose Rivera) यांनी चित्रपट मूळ पुस्तकापेक्षा चांगला बनवलाय.
मोटरसायकल डायरीचं संगीत ही त्याची आणखी एक जमेची बाजू आहे. गुस्तावो सन्ताओलाज्यानी (Gustao Sabtaolalla) तयार केलेला OST जबरदस्त आहे. तो चित्रपटाच्या एकूण मांडणीत एकदम मिसळून जातो पण त्याचा परिणाम जाणवत रहातो.