Thursday 23 September, 2010

कॉमनवेल्थ, खेळ, व्यवसाय वगैरे वगैरे

बर्‍याच दिवसांनी पुन्हा ब्लॉग लिहायला घेतलाय. आज हपिसात चर्चा करत होतो. खरं म्हणजे आम्ही हपिसात तेवढचं करतो. बोलताना विषय अर्थात कॉमनवेल्थवर आला. कॉमनवेल्थला मराठीमध्ये राष्ट्रकुल म्हणतात. वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर मात्र सर्रास कॉमनवेल्थ हाच शब्द वापरतात. किती ’पत्रकारांना’ राष्ट्रकुल म्हणजे कशाबद्दल बोलतोय ते कळेल हा प्रश्नच आहे. पण तो विषय पुन्हा केव्हातरी.
मुळांत राष्ट्रकुल म्हणजे काय, भारत त्याचा सदस्य का आहे. यावर चर्चा झाली. त्यामधून भारत त्याचा सदस्य असल्यामुळे किंवा नसल्यामुळे भारताला काहिच फरक पडत नाही आणि मेंबरशिप फ़ी काही खूप नाही त्यामुळे आपण मेंबर असावं असा निर्णय तत्कालिन लोकांनी घेतला असावा, असा निष्कर्ष निघाला.
विनोदाचा भाग सोडला तरी खरंच भारताला त्याचा काय फायदा आहे हे मला तरी कळलं नाही.  विकिपिडीयावर तर राष्ट्रकुल खेळ हे राष्ट्रकुलाचे सर्वात दृश्य स्वरूपाचं कार्य आहे असा उल्लेख केला आहे. ईंग्लंडची राजा/राणी राष्ट्रकुलाचे पदसिद्ध प्रमुख असतात. त्यामुळे मला तर हा प्रकार इंग्लंडच्या वसाहतवादी आणि साम्राज्यवादी ईतिहासाचं प्रतिक आहे असं वाटतय.
आता हा विषय चर्चेला यायच कारण म्हणजे ऑक्टोबरमध्ये होणारे राष्ट्रकुल खेळ हेच होतं. त्यालाही आयोजकांच्या ढिसाळ आणि भ्रष्ट कारभारामुळेच प्रसि्द्धी मिळाली आहे. जर सर्व अयोजन व्यवस्थित केलं असतं तर कोणीही या आयोजनाकडे आणि त्यात होणा‌र्‍या खेळांकडे ढुंकूनही पाहिलं नसतं, असं माझं प्रामाणिक मत आहे. या आधीचे राष्ट्रकुल खेळ कुठे झाले होते आणि त्यात भारताला किती पदके मिळाली होती हे कोणाला माहिती आहे का? मलाही ते विकी बघितल्याशिवाय सांगता यायचं नाही. मला खात्री आहे की बहुसंख्य भारतियांना हे माहिती नसेल.
आता सर्वात वादग्रस्त मुद्दा. खेळाचं आपल्या आयुष्यात नेमकं स्थान काय.  मी खेळ खेळतो, आधीही खेळायचो. मी खेळतो कारण मला मजा येते म्हणून. हौशी खेळाडू हौस म्हणूनच खेळ खेळतात. पण काहीजण व्यवसाय म्हणून खेळ खेळतात. त्यांना बहुतेक व्यावसायिक खेळाडू म्हणतात किंवा त्यांची तरी तशी अपेक्षा असावी. कारण बहुतेक खेळाडूंच्या संघटनांच्या नावांमध्ये ’व्यवसायिक’ असा शब्द असतो. उदा. Association of Tennis Professionals (ATP) किंवा आता अस्तित्वात नसलेली Professional Chess Association (PCA). खेळाचे जे कथित फायदे आहेत ते व्यावसायिक खेळाडूंना होतात तसेच हौशी खेळाडूंना होतच असतिल. उलट खेळाची खरी गरज हौशी खेळाडूंनाच आहे. कारण त्यांना त्यांचा खेळाव्यतिरिक्त व्यवसाय आहे. त्यामुळे खेळाचे जे फायदे आहेत त्याची गरज त्यांनाच आहे. व्यावसायिक खेळाडू हे ईतर सर्व व्यावसायिकांप्रमाणेच आहेत असं मानलं तर मग त्यांच्यासाठी सरकारने किंवा सरकार पुरस्कृत स्पर्धा भरवायची गरजच काय. शिक्षक, तंत्रज्ञ किंवा डॉक्टर यांच्यासाठी सरकारने कुठे आंतरराष्ट्रीय स्पर्धा नियमितपणे भरवल्याचं ऐकिवात नाही. त्या-त्या व्यावसायिकांच्या संघटनाच त्यांच्यासाठी व्याख्याने, स्पर्धा, सभा आयोजित करतात. अनेक खेळाडूंच्या संघटनासुद्धा स्पर्धा आयोजित करतात. उदा. ATP स्पर्धा. शिक्षक, डॉक्टर ईत्यादी व्यावसायिकांचा समाजाला काहितरी उपयोग आहे. व्यावसायिक खेळाडूंचा समाजाला नेमका काय उपयोग आहे की त्यांच्यासाठी सरकारने काही करावं? ऑलिंपीक, आशियाई खेळ, राष्ट्रकुल स्पर्धा अशा स्पर्धांच्या आयोजनामध्ये सरकारने भाग घ्यावा का?  त्यासाठी खेळाडूंना/संघटनांना वेगळी मदत करावी का?
मला या विषयाचं पुरेसं आकलन झालेलं नाही. पण तुम्हाला काय वाटतं हे कळलं तर काही पामराच्या ज्ञानात भर पडेल.

No comments:

Post a Comment