Monday 23 May, 2011

पिंक फ़्लॉईड आणि ईनसाईड जॉब

गेल्या आठवड्यात सुहासने मला एक ईमेल पाठवला होता. त्याचा विषय होता "बॅंक नावाची शिवी".  मी पुढे वाचलं तर ते त्याच्या हेरंब ओक नावाच्या कोणा मित्राने लिहिलेल्या ब्लॉगचं नाव होतं. २००८ च्या आर्थिक मंदीविषयी ईनसाईड जॉब नावाचा माहितीपट आहे. त्याविषयी आहे.  मंदीविषयी तशी ढोबळ माहिती आधीच होती. पण सर्व सगभागी लोकांची नावं, त्यांची पार्श्वभूमी, ईतिहास ही माहिती नविन होती. तर हा घोटाळा मूलत: इन्वेस्टमेंट बँकांच्या अति हव्यासामुळे झाला होता. या सर्व संस्थांचा आणि त्यांच्या गुंतवणूक योजनांचा दर्जा ठरवणा‍र्‍या संस्था याही त्यांना सामिल झाल्या.त्यांनी चांगलं गुणांकन दिल्यामुळे सर्वसामान्यांचा पैसा या योजनांमध्ये गुंतवला गेला. या सर्वांवर नियंत्रण ज्यांनी ठेवायला हवं होतं त्या सरकारी यंत्राणांनी ते न केल्यामुळे हा घोटाळा हाताबाहेर गेला.


पण यावरून सरसकट बॅंक नावाची शिवी असं म्हणणं मला थोडं विचित्र वाटलं. मी काही बॅंकेत काम करत नाही. पण भारतात अनेक जण बॅंकिंग क्षेत्रात काम करतात. बॅंकांना माहिती तंत्रज्ञान सेवा पूरवणार्‍या क्षेत्रात माझे अनेक मित्र-मैत्रिणी काम करतात. मी स्वत: बॅंकेच्या अनेक सेवा वापरतो. २००८चं संकट आलं ते मुख्यत: अमेरिकन अर्थसंस्थांच्या अनिर्बंध हव्यासामुळे. भारतिय बँकांवर याचा थेट परिणाम झाला नव्हता. याच श्रेय भारतिय बॅंका आणि मुख्यत: नियंत्रक म्हणून रिजर्व बॅंक, सेबी यांना द्यायलाच हवं. त्यामुळे ते "बॅंक नावाची शिवी" हे सरसकट शीर्षक वाचून माझ्या डोक्यात एक तिडीक गेली होती.
हे म्हणजे निषाणी डावा अंगठा वाचून कोणी शाळा नावाची शिवी असही म्हणू शकेल. निषाणी डावा अंगठा ही डार्क कॉमेडी आहे. पण मूळ विषय तितकाच किंवा त्याच्याहून जास्त गंभीर आहे.
हा सगळे विचार तो ईमेल वाचून मनात आले होते. नंतर घरी मी तो महितीपट बघितला. चांगला आहे. काही गोष्टी थोड्या खटकल्या. एक म्हणजे, मॅनहॅटन भागातल्या वेश्यागृहात ४०-५०% अर्थसंस्थांतले लोक येणार यात नवल ते काय. सिलिकॉन व्हॅलीमधल्या वेश्यागृहात तितकेच सॉफ़्ट्वेअर तंत्रज्ञ मिळाले असते. तसंच ऍलन ग्रीनस्पॅन या माणसाविषयी नीट कल्पाना आली नाही. त्याला, अमेरिकन सरकारबरोबरच, ब्रिटीश आणि फ़्रेंच सरकारने पण त्याच्या कामिगिरीसाठी पुरस्कार दिले आहेत. असं असताना त्याची या संकटातली नक्की भूमिका काय याच अंदाज आला नाही. पण बाकी महितीपट चांगलाच आहे. मला All the president's men ची आठवण झाली.
या महितीपटा मध्ये अजून एक मुद्दा मांडला आहे. या बलाढ्य आर्थिक संस्थांनी विद्यापीठांवरही आता कब्जा केला आहे. अनेक नामवंत विद्यापीठातिल प्राध्यापक या अनेक कंपन्यांचे सल्लागार म्हणून काम करतात किंवा त्यांच्या कार्यकारी मंडळांवर असतात. त्यांच्याकडून पैसे घेऊन, त्यांना हवे तसे संशोधन करून निष्कर्ष काढतात आणि त्याला प्रसिद्धी देतात.  हा प्रकार माझ्या कधी डोक्यात नव्हता आला. हार्वर्ड, कोलंबिया या Ivy League विद्यापिठांमध्ये हा प्रकार चालत असेल हे एकदम धक्कादायक होतं माझ्यासाठी. म्हणजे हे शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांनाही असच शिकवत असतिल. जे पुढे जाऊन कदाचित त्याच आर्थिक संस्थांमधे काम करतिल किंवा कदचित आता करतही असतिल. कदाचित हेच विद्यार्थी या संकटाचे कारण झाले असतिल.

माझ्या आधीच्या विचारांची संगती लागली. तो विचार अगदीच चूकीचा नव्हता तर. शिक्षणक्षेत्रामधल्या बजबजपुरीमुळे, विद्यार्थ्यांना "चांगलं" शिक्षण नाही आणि "चांगलं" शिक्षण नसल्यामुळे सद्सदविवेकबुद्धीने निर्णय घ्यायची क्षमता नाही. आणि मग असे घोटाळे होतच रहाणार. आणि मग मला एकदम पिंक फ्लॉईडच्या, We don't need no education ची आठवण झाली. रॉजर वॉटर्स ने लिहिलेले भन्नाट शब्द आहेत. अगदीच रहावलं नाही म्हणून खाली दिले आहेत.

We don't need no education.
We don't need no thought control.
No dark sarcasm in the classroom.
Teachers leave those kids alone.
Hey, teachers! Leave those kids alone.
All in all, you're just another brick in the wall

Sunday 16 January, 2011

विकिपीडिया:१० वर्षे ज्ञानाच्या बेरजेची

विकिपीडिया: १० वर्षे
(PNG)  
विकिपीडिया: १० वर्षे
(SVG)

कालच, १५ जानेवारी २०११ रोजी, विकिपीडियाला १० वर्षे पूर्ण झाली. गूगल आणि विकी यापैकी मी काय जास्त वापरतो आणि कशाचा मला जास्त उपयोग होतो हे सांगणं कठीण आहे. कित्येकवेळा मी गूगलवर शोध घेण्याऐवजी थेट विकीवरच शोध घेतो. त्यामुळे अपेक्षित माहिती लवकर हाती लागते आणि काम लवकर पूर्ण होतं.

सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे विकीची सगळी सेवा "पूर्णपणे" मोफत आहे. या पूर्णपणेला आता फार महत्त्व प्राप्त झालं आहे. गूगल शोधही मोफत आहे परंतु त्याबदल्यात गूगल आपल्याला जाहिराती दाखवते. अर्थात या जाहिरातींचा उपद्रव थांबवण्यासाठी ऍड ब्लॉक प्लसचा पर्याय आहे. पण आणखी एक गोष्ट म्हणजे गूगल आपल्या वावराची नोंद ठेवते आणि त्याचा वापर करते. विकिपीडियावर असलं काही नाही. तुम्ही कोण आहात, काय करता याविषयी विकीला काही देणं-घेणं नाही. तुम्हाला हवी ती माहिती बघा, वाचा आणि तिचा मुक्तपणे वापर करा. तुम्हाला काही जास्त माहिती असल्यास ते लिहून ईतरांना उपलब्ध करून द्या. साधा-सोपा विचार पण त्यापासून सुरू  झालेल्या विकीने ईतर विश्वकोषांच्या तोंडाला आता फेस आणलाय. इतकं की मायक्रोसॉफ्टला एन्कार्टा विश्वकोष बंद करावा लागला.

या मुक्ततेचे काही दूष्परिणामही आहेत. परवाच मधुगिरीच्या ट्रेकसाठी शोध घेताना विकीवर मधुगिरीच्या पानावर दिलेली माहिती.
कुठली SLJ मेस आणि कुठलं JS किंवा SJ हॉस्पिटल(की प्रसुतीगृह) आणि त्याचा मधुगिरीच्या भूगोलाशी काय संबध हे एक तो लिहीणाराच जाणे! अर्थात तिथेही Edit बटण आहेच आणि माहितगार माणसाने ते सुधारणं अपेक्षित आहे. 
हा मुक्त ज्ञानकोश अनेक भारतिय भाषांमधेही उपलब्ध आहे.  परंतु इंग्रजी भाषेच्या तुलनेने त्या लेखांची संख्या आणि दर्जा दोन्हीही कमीच आहे. पण त्याची जबाबदारीही त्या त्या भाषिक लोकांचीच आहे. मराठी विकीचा दर्जा उंचावण्याची जबाबदारी त्यामुळे आपलीच आहे. दूर्दैवाने, भारतात शिक्षणाची भाषा ईंग्रजी असल्याने, जे काही थोडं ज्ञान अस्मादीकांना आहे ते मराठी मध्ये व्यवस्थित उतरवणं कठिण होऊन बसलेलं आहे. ईंग्रजीमधून मराठी मध्ये भाषांतर करणं किती कठीण आहे याचा प्रत्यय हा ब्लॉग सुरू केल्यावरच आला आहे. परंतु, ज्या गोष्टी भारतामध्येच विकसित झाल्या आहेत त्यातरी किमान मराठी विकीमध्ये व्यवस्थित नोंदवणं शक्य आहे. उदाहरणार्थ, भारतिय शास्त्रीय संगीत, हिंदूस्थानी किंवा कर्नाटकी हे भारतातच विकसित झाले आहे. त्यातील सर्व संकल्पना मराठी भाषेतच आहेत. किमान अशा विषयांवर तरी मराठी विकीमध्ये व्यवस्थित लेख का असू नयेत? तबला, ताल या विषयांवर लेख आहेत पण मात्रा या विषयावर लेख नाही. भैरवी, मारवा, तोडी ईत्यादी रागांविषयी पाने आहेत पण त्यामध्ये त्यातले स्वरसुद्धा दिलेले नाहीत. वाईट याचं आहे की, महाराष्ट्रात शास्त्रीय संगीत गाणारे, समजणारे अनेक दर्दी लोक आहेत पण तरीही विकीची अवस्था काही फार चांगली नाही.
विकीच्या पहिल्या दशकात विकी इंग्रजी भाषेमध्ये वाढला. अशी अपेक्षा करूया की या दूसर्‍या दशकात तो ईतर भाषांमध्येही वाढेल. 
टीप: वरील विकिपीडिया १० वर्षे ज्ञानाच्या बेरजेची हा लोगो मी तयार केला आहे. तो मूळ ईंग्रजी Sharing sum of all knowledge, वरून बनवला आहे. त्या ईंग्रजी वाक्याच भाषांतर जमलं नाही म्हणून हे १० वर्षे ज्ञानाच्या बेरजेची हे बनवलं. PNG बहुतेक सगळ्या ब्राऊजर मधे व्यवस्थित दिसेल. Scalable Vector Graphics (SVG) हे नविन प्रमाण सध्या विकसित होत आहे आणि त्यात देवनागरी अक्षरे आहेत त्यामुळे तो लोगो कदाचित सगळ्या ब्राउजरमध्ये नीट दिसणार नाही. फायरफॉक्स ३.६ मध्ये तो व्यवस्थित दिसतो.


Sunday 9 January, 2011

ट्रेक: महाराष्ट्रातले आणि कर्नाटकातले

मी ट्रेक बरेच केले. पण मी काही अस्सल/अट्ट्ल/ हाडाचा ट्रेकर नाही. नाही म्हणायला ट्रेकर मंडळींची पंढरी असलेला हरिश्चंद्रगड मी दोन वेळा केलाय. पण नळीच्या वाटेने एकदापण नाही. तोरणा केला पण राजगड नाही. तुंग केला पण तिकोना नाही. कलावंतीण केला पण प्रबळगड नाही. अगदी मोजायलाच बसलो तर २०-२५ किल्ले तरी भरतील. खरं म्हणजे मी आणि पराग बसलोच होतो परवा मोजायला. त्यामुळेच हा लेखन प्रपंच. मी ट्रेकींग केलं ते बरचसं मित्र आणि नातेवाईकांबरोबर. तसं ’निसर्गभ्रमण’ बरोबर मी ३-४ ट्रेक केले आणि ’क्षितीज’बरोबर एक ट्रेक केला. IIT मधे असताना तिथल्या मित्रांबरोबर आणि शाळेतल्या मित्रांबरोबर बरेच ट्रेक झाले. सांगायचा मुद्दा हा की मी बरेच ट्रेक केलेत. खरं म्हणजे मी हा मुद्दा पहिल्याच वाक्यात सांगितला आहे. पण आपलं संदर्भासहित स्पष्टीकरण केलं.
गेली दीड-पावणे दोन वर्ष मी बंगळुरूमधे रहातो आहे. त्या काळात मी इथे ३-४ ट्रेक केले. इथला पहिला ट्रेक म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव होता. शुक्रवारी गांधी जयंती आली होती त्यला जोडून तो ट्रेक केला होता. सागर जवळ भिमेश्वर आणि डब्बे धबधबा असा हा ट्रेक होता. पण या ट्रेक मध्ये पावसाने आमची अक्षरश: दैना उडवली. पूर्ण पावसात दिवसभर नखशिखांत भिजल्यावर संध्याकाळी आमचा वाटाड्या रस्ता विसरला. त्यात इकडे तिकडे भटकताना अर्ध्या तासात काळोख झाला. सगळ्या शेतांत आणि वाटांमधे इतकं पाणि भरलं होतं की कोणिही रस्ता चूकलंच असतं.शेवटी मुक्कामाच्या घरात पोचल्यावर, सगळे त्राण संपल्यावर, लक्षात आलं की बॅगेमधलं सगळं काही ओलं झालंय. सगळं म्हणजे सगळं. रात्री मी फक्त ओला पंचा गुंडाळून झोपलॊ होतो. माझ्या नोकिया फोनची बांधणी किती चांगली आहे ते मला तेव्हा जाणवलं. त्यानंतर अजून एक दिवस तोच प्रकार केला. या पूर्ण प्रवासात जळवा साथीला होत्याच. सुरूवातीला फक्त पाय़ांपुरत्या असलेल्या जळवा नंतर-नंतर छातीपर्यंत येऊन पोचलेल्या होत्या.
त्या भयानक ट्रेकनंतर पश्चिम घाटामध्ये कुमार पर्वत हा ट्रेक केला. स्कंधगिरी आणि आंतरगंगे (याला ट्रेक म्हणावं का याविशषयी विद्वानांमधे दूमत आहे!) असे दोन एकदिवसीय ट्रेक केले.
कर्नाटकातल्या ब‍र्याच ट्रेकच्या जागा या पश्चिम घाटामध्ये आहेत. त्यामुळे बंगळुरूपासून तिथे जायलाच आधी ६-१० तास लागतात. त्यानंतर खरा ट्रेक आणि ६-१० तास बसचा परतिचा प्रवास. म्हणजे एक-दीड दिवस प्रवास आणि एक-दीड दिवस ट्रेक असं होतं. या लांबच्या बस प्रवासामुळे हे ट्रेक महाराष्ट्रातल्या मी केलेल्या ट्रेकच्या तुलनेने बरेच महाग होतात. पुन्हा बर्‍याच ठिकाणांचा इतिहास माहित नाही. किमान आम्हालातरी माहित नाही आणि कन्नडा येत नसल्यामुळे स्थानिक लोकांशी संवाद साधता येत नाही त्यामुळे त्यांच्याकडूनही काही समजत नाही. महाराष्ट्रात केलेले बहुतेक ट्रेक हे किल्ले असतात आणि त्यांचा इतिहास काहितरी माहिती असतो. तो "आपला" इतिहास असल्यामुळे त्याविषयी जास्त जिव्हाळा वाटतो. इथले बरेचसे ट्रेक हे नुसतेच ट्रेक आहेत. त्याला काही ऐतिहासिक संदर्भ असतोच असं नाही. ऐतिहासिक संदर्भ असलाच तरी तो माहिती नसल्यामुळे त्याजागेविषयी फार काही उत्सुकता किंवा जिव्हाळा वाटत नाही.
महाराष्ट्रातले बरेचसे ट्रेक हे मित्रांबरोबर केले होते. जिथे अनोळखी ग्रुपबरोबर केले होते तिथेही ओळख आणि मैत्री लवकर होते. इथे ग्रुपमध्ये कन्नड, तमिळ, मल्लू लोक असतात, त्यात त्यांची आधीपासून एकमेकांशी ओळख असेल तर आपल्यासारख्या तिर्‍हाईताची त्यांच्याशी मैत्री होणं अजून कठिण होऊन बसतं. त्यामुळे नेहमीच्या ३-४ मित्रांबरोबरच ट्रेक होतात.  त्यामुळॆ त्यांच्यातलं कोणाला जमणार नसेल तर ट्रेकचा प्लॅन रद्द होतो.
कर्नाटकातल्या पश्चिम घाटामध्ये प्रचंड उभे कातळ फ़ार नाहीत. त्यामुळे ट्रेकमध्ये "रॉक पॅच" फ़ार नसतात. . ढाक-बहिरी चा ट्रेक जसा अयशस्वी होऊ शकतो तसा प्रकार इथे होत नाही. त्यामुळे ट्रेकची काठिण्य पातळी चालायच्या अंतरावरून ठरते. एक आहे की उभेच्या उभे कातळ नसल्यामुळे आणि पाऊस प्रचंड असल्यामुळे घनदाट जंगल प्रचंड आहे. महाराष्ट्रात इतकं जंगल फक्त महाबळेश्वर-प्रतापगड (जावळी) परिसरातच मी बघितलय. या जंगलांमध्ये जळवाही खूप असतात आणि त्या चालताना त्राही भगवान करून सोडतात. जळवा मी महाराष्ट्रात फक्त आंबोलीला बघितल्या होत्या, त्यांची संख्याही इथल्या मानाने नगण्यच होती.
पश्चिम घाटापासून दर दख्खनच्या पठारावर मात्र खडक प्रचंड आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर शोलेचं चित्रीकरण जिथे झालं ते रामनगर, हंपी वगैरे ठिकाणी पिवळ्या-तपकिरी रंगाचे प्रचंड खडक बघायला मिळतील. पण सरळसोट दरीत जाणारे ताशीव काळे कडे इथे नाहीत.
परागशी चर्चा करताना आलेले हे काही मुद्दे.
फक्त पश्चिम घाट आणि दख्खनच्या पठाराच्या हजार-बाराशे किलोमीटर अंतरामध्ये एवढा फरक. भारतामध्ये किती विविधता आहे याचा हा एक नमुना.