Saturday, 12 June, 2010

मांजा आणि ट्रेड

नुकताच मी सुहासने सांगितलं म्हणून राही अनिल बर्वे दिग्दर्शित ’मांजा’ हा लघुपट बघितला. तो बघून मला मी आधी बघितलेल्या स्पॅनिश-ईंग्रजी ’ट्रेड’ या चित्रपटाची आठवण झाली. खरं तर कुठल्याही दोन कलाकृतींची तुलना अयोग्य आहे. तो कलाकारांवर अन्याय आहे. पण माझा नाईलाज आहे. दोन्ही चित्रपटांविषयी एकाच लेखात लिहील्यामुळे थोड्याफ़ार प्रमाणात तुलना होणं अपरिहार्य आहे. पण तो माझा हेतू नाही. रसिकांनी दोन्ही चित्रपट बघावे आणि आपलं मत बनवावं.
दोन्ही चित्रपटांमध्ये कथेमध्ये काही साम्यस्थळे आहेत. दोन्हीही चित्रपटांमध्ये एक बहीण-भाऊ हे मुख्य भूमिकेमध्ये आहेत आणि बालकांचे लैंगिक शोषण हा विषय आहे. ट्रेडमध्ये लैंगिक शोषणाबरोबरच मानवी तस्करी (human trafficking) हा मुख्य विषय आहे.
दोन्हीही चित्रपट मी एकदाच बघितले आणि मला वाटत नाही की मी पुन्हा बघायचं ’धाडस’ करेन. दोन्हीही चित्रपट चांगले आहेत पण ते एवढे, hard hitting आहेत की पुन्हा बघायची ईच्छा होत नाही. ट्रेड मी कधितरी जवळ्जवळ २ वर्षंपूर्वी हॉस्टेलवर रात्री बघितला होता, त्या रात्री मी झोपू शकलो नाही. त्यानंतर पुन्हा बघायची ईच्छा नाही. त्यामुळे त्या चित्रपटाबाबत तपशीलांत थोडया चुका असू शकतात.
मांजा ४० मिनीटांचा लघुपट आहे. खरं तर कथा १-२ दिवसांत घडलेली आहे पण ती नॉन-लिनीअर पद्धतीने मांडली आहे. बहीण-भाऊ आणि एक पिसाट हवालदार यांची कथा. कथा काय असणार याची कल्पना आधीच येते आणि ती बरीचशी तशीच आहे. त्यामुळे सादरीकरण हाच महत्त्वाचा भाग. चित्रपट कृष्णधवल आहे. परत त्यातही जास्त गडद केलेला आहे. संवादामध्ये शिव्यांचा वापर प्रमाणाबाहेर झाला आहे. थोडक्यात चित्रपट वास्तववादी बनवण्याचा प्रयत्न जरा अती झाला आहे. त्यामुळे तो उलट फिल्मी वाटतो. अर्थात हे माझं वयक्तिक मत आहे. काही लोकांना तो खूपच वास्तववादी वाटला आहे. पण तरिही चित्रपट जरूर बघावा. सिनेमॅटोग्राफी जबरदस्त आहे.

ट्रेड हा २००७ मधला स्पॅनिश-ईंग्रजी चित्रपट आहे. हा चित्रपट न्यूयॉर्क टाईम्समध्ये आलेल्या लेखावर आधारित आहे. मुख्य घटना मेक्सिको आणि अमेरिकेतील टेक्सास प्रांतामधे घडतात. होर्जे आणि त्याची बहिण आद्रियाना यांची गोष्ट.

१७ वर्षांचा होर्जे लॅटिन मुलींचे ’फोटो’ दाखवून पर्यटकांना लुटण्याचं काम करत असतो. मानवी तस्करी करणारी एक टोळी आद्रियानाला पळवून नेते. अमेरिकेत विकण्यासाठी. मॉडेल बनवण्याचं अमिष दाखवून पूर्व युरोपमधून तरुण मुलींना गैरमार्गाने मेक्सिको मध्ये आणून जबरद्स्तीने वेश्याव्यवसायात ढकलायचं असाही या मल्टी-नॅशनल टोळीचा व्यवसाय असतो. वेरोनिका नावाची पोलिश तरूणी या जाळ्यात सापडते. संपूर्ण गोष्टीचा विचार केला तर सुरुवातीच्या थोड्या वेळानंतर गोष्ट काय असणार याचा अंदाज येतो. पण तरिही त्यातले अनेक प्रसंग, त्यातील संवाद आणि अभिनयामुळे प्रचंड परिणामकारक होतात, कायम लक्षात रहातात. आद्रियाना आणि वेरोनिकामधील प्रसंग, टोळीतील गुंड आणि वेरोनिकामधील संवाद, अमेरिकी पोलिस रे शेरिडन आणि हॉर्जे यांच्यामधील संवाद परिणामकारक आहेत. रे शेरिडनच्या उपकथानकामुळे मुख्य कथेमध्ये अनेक
रहस्य निर्माण होतात. त्यातील काही रहस्यांचा उलगडा चित्रपट संपला तरीही होत नाही. आणि त्यातील वेगवेगळ्या शक्यतांचा विचार करून वेड लागायची वेळ येते. रे शेरिडन साकरणार्‍या केविन क्लाईन, वेरोनिकाची भूमिका साकारणार्‍या अलिचा बचेल्दा(Alicja Bachleda) यांच काम लक्षात राहतं. सेझार रामोस (Cesar Ramos) याचं हे बहुतेक पहिलंच काम, तरिही त्याने साकारलेला हॉर्जे जबरदस्त आहे. चित्रपटाची पटकथा मोटरसायकल डायरीवाल्या होसे रिवेराची आहे.
नक्की बघाच.

2 comments:

  1. मांजा आणि ट्रेड दोन्ही आवडले...
    ट्रेडची कथा आणि मांडणी आवडली. सगळयांचे अभिनय अप्रतिम. मांजामध्ये शिव्या होत्याच खूप, पण मराठीमध्ये केलेला एक प्रयत्‍न म्हणून तो ही आवडला... :)

    ReplyDelete
  2. तुझी पोस्ट वाचून मी ही हे दोन्ही चित्रपट पाहायचं ठरवलय.... मांजा बद्दल ऐकून होते..."तू पुन्हा पाहणार नाहीस" असही सांगितल गेल..
    पण आता किमान एकदा तरी पहावा अस वाटतय...

    ReplyDelete