Monday 23 May, 2011

पिंक फ़्लॉईड आणि ईनसाईड जॉब

गेल्या आठवड्यात सुहासने मला एक ईमेल पाठवला होता. त्याचा विषय होता "बॅंक नावाची शिवी".  मी पुढे वाचलं तर ते त्याच्या हेरंब ओक नावाच्या कोणा मित्राने लिहिलेल्या ब्लॉगचं नाव होतं. २००८ च्या आर्थिक मंदीविषयी ईनसाईड जॉब नावाचा माहितीपट आहे. त्याविषयी आहे.  मंदीविषयी तशी ढोबळ माहिती आधीच होती. पण सर्व सगभागी लोकांची नावं, त्यांची पार्श्वभूमी, ईतिहास ही माहिती नविन होती. तर हा घोटाळा मूलत: इन्वेस्टमेंट बँकांच्या अति हव्यासामुळे झाला होता. या सर्व संस्थांचा आणि त्यांच्या गुंतवणूक योजनांचा दर्जा ठरवणा‍र्‍या संस्था याही त्यांना सामिल झाल्या.त्यांनी चांगलं गुणांकन दिल्यामुळे सर्वसामान्यांचा पैसा या योजनांमध्ये गुंतवला गेला. या सर्वांवर नियंत्रण ज्यांनी ठेवायला हवं होतं त्या सरकारी यंत्राणांनी ते न केल्यामुळे हा घोटाळा हाताबाहेर गेला.


पण यावरून सरसकट बॅंक नावाची शिवी असं म्हणणं मला थोडं विचित्र वाटलं. मी काही बॅंकेत काम करत नाही. पण भारतात अनेक जण बॅंकिंग क्षेत्रात काम करतात. बॅंकांना माहिती तंत्रज्ञान सेवा पूरवणार्‍या क्षेत्रात माझे अनेक मित्र-मैत्रिणी काम करतात. मी स्वत: बॅंकेच्या अनेक सेवा वापरतो. २००८चं संकट आलं ते मुख्यत: अमेरिकन अर्थसंस्थांच्या अनिर्बंध हव्यासामुळे. भारतिय बँकांवर याचा थेट परिणाम झाला नव्हता. याच श्रेय भारतिय बॅंका आणि मुख्यत: नियंत्रक म्हणून रिजर्व बॅंक, सेबी यांना द्यायलाच हवं. त्यामुळे ते "बॅंक नावाची शिवी" हे सरसकट शीर्षक वाचून माझ्या डोक्यात एक तिडीक गेली होती.
हे म्हणजे निषाणी डावा अंगठा वाचून कोणी शाळा नावाची शिवी असही म्हणू शकेल. निषाणी डावा अंगठा ही डार्क कॉमेडी आहे. पण मूळ विषय तितकाच किंवा त्याच्याहून जास्त गंभीर आहे.
हा सगळे विचार तो ईमेल वाचून मनात आले होते. नंतर घरी मी तो महितीपट बघितला. चांगला आहे. काही गोष्टी थोड्या खटकल्या. एक म्हणजे, मॅनहॅटन भागातल्या वेश्यागृहात ४०-५०% अर्थसंस्थांतले लोक येणार यात नवल ते काय. सिलिकॉन व्हॅलीमधल्या वेश्यागृहात तितकेच सॉफ़्ट्वेअर तंत्रज्ञ मिळाले असते. तसंच ऍलन ग्रीनस्पॅन या माणसाविषयी नीट कल्पाना आली नाही. त्याला, अमेरिकन सरकारबरोबरच, ब्रिटीश आणि फ़्रेंच सरकारने पण त्याच्या कामिगिरीसाठी पुरस्कार दिले आहेत. असं असताना त्याची या संकटातली नक्की भूमिका काय याच अंदाज आला नाही. पण बाकी महितीपट चांगलाच आहे. मला All the president's men ची आठवण झाली.
या महितीपटा मध्ये अजून एक मुद्दा मांडला आहे. या बलाढ्य आर्थिक संस्थांनी विद्यापीठांवरही आता कब्जा केला आहे. अनेक नामवंत विद्यापीठातिल प्राध्यापक या अनेक कंपन्यांचे सल्लागार म्हणून काम करतात किंवा त्यांच्या कार्यकारी मंडळांवर असतात. त्यांच्याकडून पैसे घेऊन, त्यांना हवे तसे संशोधन करून निष्कर्ष काढतात आणि त्याला प्रसिद्धी देतात.  हा प्रकार माझ्या कधी डोक्यात नव्हता आला. हार्वर्ड, कोलंबिया या Ivy League विद्यापिठांमध्ये हा प्रकार चालत असेल हे एकदम धक्कादायक होतं माझ्यासाठी. म्हणजे हे शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांनाही असच शिकवत असतिल. जे पुढे जाऊन कदाचित त्याच आर्थिक संस्थांमधे काम करतिल किंवा कदचित आता करतही असतिल. कदाचित हेच विद्यार्थी या संकटाचे कारण झाले असतिल.

माझ्या आधीच्या विचारांची संगती लागली. तो विचार अगदीच चूकीचा नव्हता तर. शिक्षणक्षेत्रामधल्या बजबजपुरीमुळे, विद्यार्थ्यांना "चांगलं" शिक्षण नाही आणि "चांगलं" शिक्षण नसल्यामुळे सद्सदविवेकबुद्धीने निर्णय घ्यायची क्षमता नाही. आणि मग असे घोटाळे होतच रहाणार. आणि मग मला एकदम पिंक फ्लॉईडच्या, We don't need no education ची आठवण झाली. रॉजर वॉटर्स ने लिहिलेले भन्नाट शब्द आहेत. अगदीच रहावलं नाही म्हणून खाली दिले आहेत.

We don't need no education.
We don't need no thought control.
No dark sarcasm in the classroom.
Teachers leave those kids alone.
Hey, teachers! Leave those kids alone.
All in all, you're just another brick in the wall

2 comments:

  1. >> पण यावरून सरसकट बॅंक नावाची शिवी असं म्हणणं मला थोडं विचित्र वाटलं.
    >> त्यामुळे ते "बॅंक नावाची शिवी" हे सरसकट शीर्षक वाचून माझ्या डोक्यात एक तिडीक गेली होती.

    बँका (हो हो अजूनही) ग्राहकांना कशा फसवतात आणि ग्राहकांना त्याची कल्पनाही कशी नसते याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही दोन वाक्य आहेत. असो पण २००८/०९ च्या दरम्यान (शिकत वगैरे नसलास आणि नोकरी करत असलास तर) तुझी, तुझे मित्र, कलिग्ज, नातेवाईक इ किती जणांच्या नोकऱ्या गेल्या नाहीत किंवा तडजोडी करून, कमी पगार घेऊन, बोनस/वाढीव पगार न घेता कामं करावी लागली ते ऐकायला आवडेल.. माझ्या कैक मित्रांच्या बाबतीत हे घडलंय.

    तेही जाऊदे. ग्राहकांनी गुंतवलेला पैसा बँका कशाकशासाठी वापरत होत्या (इराणचं अण्वस्त्र संशोधनाला आर्थिक सहाय्य म्हणून, ड्रग्ज किंवा तत्सम धंद्यात) हे तू त्या माहितीपटात पुन्हा एकदा नीट बघितलंस तर तुला शीर्षकापाठी असलेल्या संतापाचा उलगडा होईल.

    ReplyDelete
  2. "बँका (हो हो अजूनही) ग्राहकांना कशा फसवतात आणि ग्राहकांना त्याची कल्पनाही कशी नसते याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही दोन वाक्य आहेत." हे वाक्य म्हणजे माझ्या आणि समस्त बँक ग्राहकांच्या बुद्धिमत्तेचा अनादर आहे. तुझ बँकिंग क्षेत्राविषयी ज्ञान अगाध आहे असं दिसत. त्यामुळे मी काही उत्तर द्यावं की नाही याविषयी मनात संभ्रम आहे. पण माझ्या अल्पमती प्रमाणे काही मुद्दे खाली मांडले आहेत.

    तू २००८-०९ मधील नोकरयांचा विषय काढला आहेस तर, मला आणि माझ्या अनेक मित्रांना, मंदीच्या ऐन भरात, डिसेंबर २००८ मध्ये नोकर्या मिळाल्या होत्या. माझ्या माहिती मध्ये २ जणांच्या नोकर्या गेल्या आणि दोघांनाही पुन्हा नोकर्या मिळाल्या होत्या. काही संस्थामध्ये पगार कमी झाले किंवा वाढले नाहीत. http://techcrunch.com/2010/09/21/now-that-the-recession-officially-ended-whatever-happened-to-that-other-shoe/ हा एका अमेरिकन लेखिकेचा लेख आहे. २००० च्या IT bubble मध्ये ही अनेकांच्या नोकर्या गेल्या होत्या. IT/software एक शिवी आहे का ते ही समजू द्या म्हणजे माझ्या पामराच्या ज्ञानात भर पडेल.
    इराणचं अण्वस्त्र संशोधनाला आर्थिक सहाय्य भारत सरकार प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष पणे करताच आहे. भारतीय तेल कंपन्या अब्जावधी रुपये इराणला देतात. भारत स्वत: CTBT/NPT अशा कुठल्याही कराराचा सदस्य नाही.
    भारतात बंदी असलेले अनेक अंमली पदार्थ युरोपमध्ये अधिकृतपणे उपलब्ध असतात. ड्रग्स मधील बँकांच्या गुंतवणुकीविषयी मला पुरेशी माहिती नाही.
    मुख्य मुद्दा इथे बाजूला पडतोय. अमेरिकेतील आर्थिक मंदीचा परिणाम जगावर झालाच. बँक प्रणाली मध्ये तृटी आहेतच. पण म्हणून सरसकट "बँक एक शिवी" हे मला पटत नाही. भारतीय बँकांनी अमेरिकन बँकांप्रमाणे व्यवसाय का केला नाही. बँकांमुळे किती शेतकऱ्यांना सावकारी पाशातून सुटण्यासाठी एक पर्याय उपलब्ध झाला. किती छोट्या उद्योग धंद्यांना मदत मिळाली. किती लोकांचा घराच स्वप्न साकार झाल. किती लोकांना नोकर्या मिळाल्या. याचाही विचार व्हावा.
    एका अमेरिकन investment बँकिंग वरील माहितीपटावरून सर्व बँकिंग क्षेत्राविषयी एकदम टोकाचं मत बनवण योग्य नाही असं मला वाटत.

    ReplyDelete