Tuesday 3 July, 2012

काउचसर्फिंग

काउचसर्फिंगविषयी मी कधीतरी शाळा कॉलेजात असताना वाचलं होतं. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी नसतात असं समजून सोडून दिलं. पुढे TechCrunch वाचताना Airbnb  विषयी समजलं आणि काउचसर्फिंगशी त्याची सरळ स्पर्धा आहे हेही समजलं. आमच्या Ultra Low Budget युरोट्रीपसाठी या पर्यायांचा विचार करायला हवा असं वाटलं.
काउचसर्फिंग म्हणजे प्रवासी एका स्थानिक माणसाच्या घरी पाहुण्यासारखा रहातो. काउचसर्फिंगला काउचसर्फिंगच्या परिभाषेत CS म्हणतात, असा प्रवास करणाऱ्या माणसाला (सर्फर) Surfer म्हणतात आणि स्थानिक माणसाला होस्ट (Host) म्हणतात. couchsurfing.com हे संकेतस्थळ अशा सर्फर आणि होस्ट यांची गाठ घालून द्यायचं काम करतं. याची सुरुवात झाली 1999 साली. कॅसी फेंटन (Casey Fenton) नामक अमेरिकी विद्यार्थ्याला आईसलंडच तिकीट मिळालं. प्रवासाची सोय झाल्यावर राहायच काय करायचा असा प्रश्न आला. त्याने सरळ आईसलंडमधील विद्यापीठातील मुलांना email spam केलं. 1500 मधील 50 लोकांनी प्रतिसाद दिला. त्यातून काउचसर्फिंग जन्माला आलं. सुरुवातीला ती नफा न कमावणारी धर्मादाय संस्था होती, पण हल्लीच 2011 मध्ये काउचसर्फिंगची नफा कमावणारी कंपनी म्हणून नोंदणी करण्यात आली.
साहजिकच, मी सुरुवातीला  साशंक होतो. अश्या राहण्यामध्ये सुरक्षेची काय हमी. एक तर परक्या देशात आणि परक्याच्या घरी, काही झालं तर? आधी असं स्वतःच्या घरी अनोळखी माणसाला  कोण राहायला देईल? दिलंच तर सोय कशी असेल? भाषा समजेल की नाही?  असे सगळे मुलभूत प्रश्न होतेच. वर पुन्हा मग फुकट राहणार तर त्यांना त्रास देणं योग्य नाही. काहीतरी फुल न फुलाची पाकळी भेटवस्तू द्यायला हवी असले उपप्रश्न पण होतेच.
 1-2 मित्रांनीसुद्धा कल्पना हसण्यावारीच नेली. त्यामुळे सुरुवातीला मत नकारात्मकच होतं.
पण तरीही फुकट ते पौष्टिक तत्त्वानुसार मी नोंदणी केली. आपला profile तयार केला. FAQs वाचले. मुलभूत आणि उपप्रश्नांची अगदी विस्तृत उत्तरं दिली होती. थोडं बरं वाटलं. नंतर त्यावरच्या गटांचा शोध लागला. बहुतेक शहरांचा आणि देशांचा स्वतःचा गट असतो. मी लगेच बंगळूरू, मुंबई आणि युरोप अशा गटांत शामिल झालो.
त्यात एक समजलं की आपल्यासारखे बरेच जण आहेत. गर्दीचा आधार ईश्वराहून मोठा असतो हेच खरं. शेंगेन विसाची माहिती आणि शंका-समाधान करायला त्याचा बराच उपयोग झाला.
एकदा विसा मिळाला आणि मग पुन्हा मुख्य प्रश्न आला. काउचसर्फिंग करावं की नाही. मी पुन्हा देशी अमेरिकी मित्राला विचारलं त्याने त्याच्या स्वभावानुसार "I am open to everything." असं  म्हणून चेंडू परतवला.
मग मी CS वर आमचं प्रवासाचं वेळापत्रक प्रकाशित केलं आणि असंच जिथे जिथे जाणार तिथल्या लोकांचे profiles बघायला सुरुवात केली.  पुन्हा एकदा मुलभूत प्रश्नांनी डोकं वर काढलं. आम्ही दोन मुलगे जाणार तर कोण मुलगी राहायला जागा देईल आम्हाला. पण सुरक्षेच्या दृष्टीने मुलगी असणं आम्हाला बरं वाटत होतं. पुन्हा पंचाईत. मग मध्यम मार्ग म्हणून विवाहित किंवा एकत्र राहणारे लोक हा पर्याय होता. असा सगळा विचार करून मी पॅरीससाठी काही विनंती (Couch Requests) पाठवल्या. मित्राने त्याच्या बाजुने काही पाठवल्या. सर्व लोकांनी काही ना काही कारणास्तव सर्व अर्ज फेटाळून लावले. आम्हाला कोच द्यायला कोणीही तयार नव्हतं, त्यामुळे काउचसर्फिंगचा प्रश्न आपोआपच मिटला.
 2/3 दिवसातच मला email आला की "Here is my couch". एका स्विस मुलीने आम्हाला स्वत:हून जागेची उपलब्धता कळवली होती. पहिल्या अपयशाने खचून(!) गेल्यावर हे मोठच यश होतं. दुसरा प्रश्न आला, मी विनंती पाठवायचो ते जरा विचार करून आपल्याला सगळं जुळेल अशा पद्धतीने, ज्यांचे profile पडताळणी झाली आहे, ज्यांचे अनेक मित्र आहेत, ज्यांच्याविषयी लोकांनी चांगले अनुभव नोंदवले आहेत अशांना. ही मुलगी स्वतःच काउचसर्फिंगला नवीन होती, आम्हीही नवे, त्यामुळे काय करावं  कळत नव्हतं. मी आपलं आता हो म्हणून टाकू, खरच वेळ आली तर काय करायचं ते मागाहून बघू, असा विचार करून तात्पुरता होकार कळवून टाकला.
"first kill" नंतर मी जरा शहाणा झालो. पॅरीस हे जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे तिथे बरेच पर्यटक येतात आणि त्यामुळे कोणी host मिळणं कठीण आहे हे समजलं. त्यामुळे मी पॅरीसच्या मुख्य शहरापासून थोडं दूर पण मेट्रोने जोडलेल्या ठिकाणी शोध घेतला आणि यश मिळालं. रेनाता (Renata) आणि थिबॉ (Thibault) या मंडळींनी तयारी दाखवली. पहिल्या दिवशी हॉटेलमध्ये मुक्काम करून नंतर 2 दिवस त्यांच्याकडे राहायचं असं  ठरलं. नंतर म्युनिक, स्टुटगार्ट, प्राग, लुसर्न इथेही लोकं मिळाली.

रेनाता आणि थिबॉ:
रेनाता ही मुळची हंगेरियन आणि  थिबॉच सगळं आयुष्य पॅरीस मधेच गेलेलं. त्यामुळे त्याला पॅरीसचा कोपरा न कोपरा माहिती होता. त्याने लगेच आम्हाला plan बनवून दिला. कुठल्या मेट्रोने कुठे जायचे काय बघायचं हे सगळं सांगितलं. फ्रेंच crêpe किंवा croissant कुठे चांगले असतात याचेही फंडे दिले. तसेच तो अॅपलचा पंखा असल्यामुळे त्याने लुव्रेमध्ये कसं अॅपलच दूकान आहे. ऑपेराच्या बाहेर कसा अॅपलचा झेंडा आहे हेही फंडे मिळाले. आणि त्याने आम्हाला त्याच्या घराची चावीच दिली. आम्ही दोघेही दोन मिनिटे अवाक झालो. आम्ही शेजाऱ्यांना चावी देताना विचार करतो आणि यांनी कोण कुठल्या कधी न पाहिलेल्या लोकांना सरळ घराची चावी देवून टाकली.
माझ्या सगळ्यात लक्षात राहिलं  ते म्हणजे त्याचा Yeah चा यॅऽह असा काहीसा उच्चार आणि etcetera चा बोलीभाषेतील वापर. जो आम्ही पुढे पूर्ण ट्रीपमध्ये मजा म्हणून वापरला.  दुसऱ्या रात्री रेनाता आणि थिबॉ आम्हाला बार मध्ये घेउन गेले. आणि आम्हाला शोध लागला की हे फ्रेंच थिबॉ महाशय वाईनसुद्धा पीत नाहीत. पण तिथे गप्पा छान मारता आल्या. पॅरीस, फ्रांस, हंगेरी, भारत आणि अमेरिका अशा बऱ्याच गप्पा झाल्या. रात्री शेवटची मेट्रो चुकल्यामुळे आम्हाला बस किंवा सायकल हे दोन पर्याय होते. आम्ही सायकलचा पर्याय निवडला. कुठल्याही सायकल स्टँडवरून सायकल घ्यायची आणि कुठल्याही सायकल स्टँडवर परत करायची अशी व्यवस्था. मग थिबॉ महाशयांनी आम्हाला पॅरीस फिरवलं. आयफेल टॉवर, सीन नदी, अमेरिकेतल्या स्वतंत्र्य देवीची प्रतिकृती अशा गोष्टी जाता जाता दाखवल्या. ती सायकल सफर अविस्मरणीय झाली.

झोरा आणि एल्विर:
सर्वात वाईट अनुभव ज्यांना आम्ही दिला असं आम्हाला वाटत ते म्हणजे झोरा आणि एल्विर. आम्ही लुसर्नला रात्री 8-9 वाजता पोचू अशी आमची अपेक्षा होती. अनेक कारणांचा एकत्र परिणाम असा झाला की रात्री 11 पर्यंत आम्ही स्वित्झर्लंडमध्ये लुसर्नपासून तासाभराच्या अंतरावर होतो. उशीर तर झालाच होता तेव्हा आम्ही एल्विरला फोन करून सांगायचं ठरवलं की आम्हाला खूप उशीर होतो आहे, तर आम्ही आता येत नाही आजची रात्र आम्ही कुठे तरी काढतो आणि उद्या येतो. त्या भल्या माणसाने लगेच सांगितलं की इथेच या, मी जागा आहे. शेवटी आम्ही रात्री 12:30 पर्यंत त्याच्या घरी पोचलो. त्याने पोचल्या पोचल्या आम्हाला घर दाखवलं, झोपायची जागा दाखवली आणि घराची चावी दिली. आमची माफी मागून तो झोपायला गेला. झोरा आधीच झोपली होती. दुसऱ्या दिवशी मी उठलो तर एल्विर कामावर निघून गेला होता. झोराशी भेट झाली. ती काहीतरी अभ्यास करत होती. कॅन्सर रुग्णांच्या मानसिकतेविषयी अभ्यास करत होती. तीही थोड्याच वेळात कॉलेजला निघून गेली. पूर्ण घर आमच्या ताब्यात देऊन ते दोघेही निघून गेले होते. दोन-तीन दिवसांचं जागरण झालं होतंच आणि रोज चालणं, प्रवास याने थकून गेलो होतो. पूर्ण दिवस भटकल्यावर रात्री 8:30-9 ला घरी पोचलो तर घरी कोणीच नव्हतं. मी पलंगावर पडलो आणि मला झोप लागली. एल्विर आणि झोरा कधी आले आणि काय याचा मला काही पत्ताच लागला नाही. दुसऱ्या दिवशी लवकर उठून बाहेर पडायचा असा आमचा विचार होता. आम्ही सगळं आटपून बसलो. पण घरात काहीच हालचाल दिसेना. मंडळी बाहेर गेली म्हणावं तर खोली बंद होती. आम्ही वाट पहावी असं  ठरवलं. आता नऊ वाजून गेले होते. इथे तर काहीच हालचाल दिसत नव्हती. शेवटी माझ्या मित्राने फोन करायचं ठरवलं की हे घरात आहेत कि नाही. त्याने फोन केला आणि एल्विरने उचलला. गोंधळ असा झाला की आतापर्यंत सगळं बोलणं मीच केलं होतं, त्यामुळे झोपमोड झालेल्या एल्विर महाशयांना कळेना ते कोणाशी बोलतायत. शेवटी माझ्या मित्राने कवीनने सांगितलं, "Basically, I am the guy who is staying in your house."

नंतर एल्विर  आणि झोरा बाहेर आले, आमच्या थोड्या गप्पा झाल्या. गप्पांमध्ये मी त्याला सहज विचारला कि तू काय करतोस, त्याने सांगितलं की तो प्लंबर आहे. मी दोन क्षण कळेना की काय म्हणावं. मी छान-छानच म्हटलं.

करीना: इंग्रजी आणि गणित या विषयांचे शिक्षक होण्यासाठी ती शिकत होती. आम्ही मुनिकला तिच्याकडे गेलो, त्यादिवशी युरोकपमधील जर्मनी-नेदरलंड सामना होता. त्यामुळे ती आम्हाला घेउन तिच्या मित्रांकडे गेली. तिच्या मित्राची लिविंग रूम किंवा हॉल होता त्याची एक भिंत पूर्ण पुस्तकांनी भरून गेली होती आणि दुसरी भिंत CD/DVD ने भरली होती. त्याच्या मतानुसार तो धूम्रपान करत नाही त्यामुळे वाचलेल्या पैशातून त्याने ती खोली भरली होती.
करीनाच्या घरी तिची अभ्यासाची पुस्तकं होती, त्यात गणिताचं पुस्तक होतं. उघडून बघितलं तर ते जर्मनमध्ये linear algebra च पुस्तक होतं आणि आम्हाला रेषीय बीजगणित म्हणताना सुद्धा विचित्र वाटतंय.

सेरा:
ही शाळेत शिक्षिका होती. आम्ही गेलो तेव्हा ती आणि तिचे मित्र-मैत्रिणी सिगरेट फुकट बीअर पीत बसले होते. त्यामुळे इथल्या शाळेत मुलांना नक्की काय शिकवतात असा प्रश्न मला पडला. नंतर कळलं की तिने घाना मध्ये 9 महिने स्वयंसेवी संस्थेमार्फत शिक्षिकेच काम केलं होतं. अझरबैजान मधेही तिने काम केलं होतं. तिच्या बोलण्यातून विकसित देशांत किती गोष्टी गृहीत धरल्या जातात आणि अविकसित देशात सामान्य गोष्टींसाठीसुद्धा किती श्रम करावे लागतात याची तिला पुरेपूर जाणीव होती हे समजलं. 
तिच्याच घरामध्ये खालच्या मजल्यावर स्टेफान नावाचा विमा कंपनीमध्ये काम करणारा माणूस राहत होता. त्याने ग्रँड कॅन्यन - लास वेगास - लॉस एंजेलिस अशी सफर हार्ले डेविडसन वर केली होती, आपल्या वडिलांबरोबर.

सोल्केम:
परतताना पॅरीसचा एक दिवस मुक्काम सोल्केमच्या घरी मुक्काम होता. आम्ही तिच्या घरी पोचलो आणि आम्हाला समजलं की ती काळी मुलगी आहे. अमेरिकी देशी मित्राने लगेच मला "कुछ हो गया तो? काले लोगों के एरिया मै क्राईम रेट कितना ज्यादा होता है." हे ऐकवलं.  ती एका खोलीत रहात होती. पण तरीही तिची कोणाही माणसाला फुकट राहायला जागा द्यायची तयारी होती.

काउचसर्फिंग हा संपूर्ण नवा अनुभव आम्हाला मिळाला. काही नाविन्यपूर्ण गोष्टीं ऐकायला मिळाल्या. नव्या शहरात वावरताना मदत झाली. काही अप्रसिद्ध पण वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी बघता आल्या. स्थानिक लोकांच्या आयुष्यात थोडं डोकावून बघता आलं. 

3 comments:

  1. अरे व्वा !!

    ह्या पोस्टसाठी धन्स रे भावा :)

    तू जेव्हा ह्या सायटीबद्दल बोललास, तेव्हाच मला ही अभिनव कल्पना मनापासून आवडली. पुन्हा एकदा आभार्स :) :)

    ReplyDelete
    Replies
    1. आभार कशाबद्दल, स्वांत सुखाय लिखाण आहे.
      कल्पना चांगलीच आहे. पण तो अनुभव घेणारे भारतात बरेच कमी लोक असतील.

      Delete
  2. हे भारीय राव ...
    धन्स सुहास , या लिंकसाठी !

    ReplyDelete