Sunday 24 October, 2010

पल्प फिक्शन

पल्प फिक्शन या चित्रपटाने क्वेंतिन तेरेंतिनोला एकदम प्रसिद्धी मिळाली. उमा थर्मन, जॉन ट्रॅवोल्टा रातोरात स्टार झाले. ब्रूस विलिसच्या चित्रपट करीअरला नवसंजीवनी मिळाली. सम्युअल जॅक्सनने केलेल्या ज्यूल्स विन्फ़िल्डच्या भूमिकेचा एक चाहता वर्ग तयार झाला. ७ ऑस्कर नामांकने असूनही, फॉरेस्ट गम्पबरोबरच्या स्पर्धेमुळे, फक्त एकच ऑस्कर पटकथेसाठी मिळालं. तरीही पल्प फिक्शन हा चित्रपट सृष्टीमध्ये एक मैलाचा दगड आहे.तेरेंतिनोची पुढे ट्रेडमार्क बनलेली, अनेक chapters असलेली पण non-linear शैली हा त्या काळात एक अनोखा प्रकार होता. चित्रपटाचे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे टोकदार संवाद. त्यामधे मुळात संवाद लेखन आणि पडद्यावर सर्व कलाकारांनी त्या संवादांना दिलेला न्याय हे दोन्ही अंतर्भूत आहे.
हा चित्रपट म्हणजे नेमक काय आहे, हे सांगणं अशक्य आहे. काहींच्या मते ही dark comedy आहे. काहींच्या मते हे पॉप संस्कृतीवर तिरकस भाष्य आहे.काहींच्या मते ही post-modern (आधुनिकोत्तर ?) कलाकृती आहे.
माझा स्वत:चा अनुभव असा की, पहिल्यांदा बघताना हा चित्रपट आवडत नाही. यात विशेष काय आहे हेच समजत नाही. काहितरी माफिया आणि त्यांच्या बेटींग, हिंसाचाराची गोष्ट आहे असं वाटतं. पण दूसर्‍यांदा चित्रपट बघताना त्यातल्या खाचाखोचा जाणवतात, संवाद एकदम आवडतात. त्या भूमिका आवडतात. सम्यूएल जॅक्सनची भूमिका खरोखरच अविस्मरणीय आहे. त्याचे संवाद खरोखरच आपल्या पाठ होऊन जातात. जॉन ट्रॅवोल्टा आणि उमा थर्मनचा नाचसुद्धा असाच लक्षात रहातो. चित्रपटाचं संगीतसुद्धा एकदम चपखल आहे.
हा चित्रपट एकदा बघून आवडण्याची शक्यता कमीच आहे. उलट पहिल्यांदासुद्धा न बघू शकलेले काहीजण मला माहिती आहेत. पण तरिही सगळ्य़ांनी प्रयत्न जरूर करावा.