Tuesday, 10 August, 2010

लडाख अनुभव: भाग १२ - उपसंहार


या शेवटाला उपसंहार म्हणायची दोन कारणे आहेत. एक म्हणजे मी काहीतरी रामायण किंवा महाभारतासारख महान लिहीलंय ही भावना फार छान आहे. आणि या सफ़रीनंतर आमचा आणि आमच्या प्रकल्पांचा थोड्याफ़ार प्रमाणात जो संहार झाला त्याच स्मरण म्हणून हा उपसंहार.
या सफरीनंतर hangover उतरायला बराच वेळ म्हणजे किमान दीड महिना लागला. आमच्यातील सर्वात वयाने आणि अनुभवाने मोठ्या असलेल्या श्रीरंगाचा hangover सर्वात आधी उतरला. M Tech च्या सर्व stage वेळेवर आटोपून आता तो तैवानमध्ये एका कंपनीमध्ये नोकरी करत आहे आणि लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. मी सरांचा ओरडा खात खात कसंबसं माझं MTech वेळेवर संपवून बंगलोरमध्ये एका कंपनी मध्ये काम करतोय किंवा करत नाहीये. समीरने थोडा स्वभिमान दाखवायचा म्हणून स्वत:च stage 2 साठी मुदतवाढ मागून घेतली, जी त्याने मागितली नसती तरी त्याला मिळालीच असती. stage 3 त्याने कशीबशी वेळेवर संपवली. तो आता कोरीआ मधे नोकरी करतोय आणि त्याचही लग्न ठरलं आहे. प्रमितची stage 3 म्हणजे शेवटचे presentation आता झाले आहे आणि काही दिवसांत तो अधिकृतपणे MTech होईल. आनंद आजकाल प्रमितप्रमाणे फोन उचलत नाही आणि परत फोन करतही नाही. तो अजून MTech stage 3 करतोय असं ऐकतोय.

लडाख अनुभव: भाग ११ - जंगबाज़

मनाली
मनाली हे मग तसं इतर सर्व हिल स्टेशन प्रमाणेच आहे. एक मुख्य रस्ता ज्याला माल रोड म्हणतात तो आहे. त्याच्यावरच सगळी हॉटेल/रेस्टॉरंट आहेत. तिथे आंध्रा मेस बघून समिर आणि गुजराथी थाळी बघून प्रमित खूष झाला. मी मात्र महाराष्ट्रीय थाळी असं काही प्रकार मिळत का नाही याचा विचार करत होतो.शेवटी महाराष्ट्रीय लोकं जिथे जे मिळतं ते खातात, मराठी पदार्थच हवे असं नाटक करत नाहित असं विचार करून गप्प बसलॊ. मनालीचं प्रसिद्ध हिडींबा देवीचं देऊळ बघून आम्ही परत आलॊ. मनाली मधे पाउस पडत होता त्यामुळे white water rafting करायची ईच्छा अपूरीच राहिली.
--

मनाली ते दिल्ली
मनाली ते दिल्ली हा प्रवास आमच्या प्लॅन प्रमाणे वोल्वो बसने करणार होतो. आणि आश्चर्य म्हणजे ते त्याप्रमाणेच झालं. एका खासगी बसच तिकीट काढले होते. बस मनालीहून निघून दुसर्‍यादिवशी सकाळी दिल्ली ला पोचणार होती. आम्ही जेवून खावून दूपारी SBI विश्रामगृहातून निघून रिक्षाने मानली च्या मुख्य रस्त्यावर येवून बसमध्ये बसलो. मी आणि प्रमित शेजारी बसलो होतो, समीर आणि श्रीरंग अशी अंकल मंडळी शेजारी शेजारी बसली होती. आणि बॉस एकटाच बसला होता. नंतर बॉसच्या बाजूला कोणी फिरंगी युवती येवून बसली. नंतर बोलाचालीत समजलं की ती इस्रायेलची आहे आणि ती आधी येवून गेली आहे. एकूण तो वळणावळणाचा रस्ता आणि बस चे स्टॉप बघून वाटायला लागलं की बस काही सकाळी लवकर दिल्लीला पोचत नाही. आमच्यापेक्षा अनुभवी असणाऱ्या इस्रायेली बाईने त्याला लगेच दुजोरा दिला. बस वाटेत एका ठिकाणी चहासाठी थांबली. रस्त्याने प्रवास करताना चहासाठी थांबणे हे अधिकृत कारण असलं तरी खरं कारण बहुतेक वेळा नैसर्गिक विधी हेच असतं. पण या ठिकाणची त्यासाठीची जी जागा होती किंवा नव्हती त्यापेक्षा निसर्गाच्या सानिध्यात उरकणं केव्हाही बरं होतं. पण जेव्हा फिरंगी लोकांना त्यातही स्त्रियांना त्याचा वापर करावा लागणं ही गोष्ट मला तरी फार लाजिरवाणी वाटली. भारतीय स्त्री-पुरुषांची कमी-अधिक प्रमाणात या सगळ्या प्रकाराची मानसिकता तयार झालेली असते. पण Incredible India म्हणून जेव्हा पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा या Incredible India चे असं दर्शन होऊ नये, एवढीच माफक अपेक्षाही पूर्ण होत नाही.
तिथून बस निघाली आणि त्या व्हीडीओ-कोच बस मध्ये व्हीडीओ सुरु करण्याचा प्रयत्न झाला. त्याच्याशी बराच वेळ झटापट केल्यावर त्या आयताकृती टीव्हीवर एक लंबवर्तुळाकार चित्र दिसू लागलं. चित्रपटाच नाव झळकल 'जंगबाज'. शीर्षक गीत सुरु झालं - "जंगबाज आ गये आ गये जंगबाज". गोविंदा आणि राजकुमार अशी भारी स्टारकास्ट. चित्रपट सुरू होताच बॉसला एकदम आठवल हा पिक्चर त्याने पहिला आहे. लगेच त्याने आम्हाला सांगितलं की या चित्रपटाचा शेवटचा डायलॉग आहे, "अगर मेरी याद आये तो मुझे याद कर लेना". एवढा godmaxx पिक्चर न बघून कसं जमणार! मग प्रमित आणि माझ्या त्यातल्या सीन आणि संवादांवर कॉमेंट्स सुरु झाल्या. अंकल लोकाना असं भरलेल्या बस मध्ये गोंधळ घालणं तितकसं रुचणार नव्हतं. बॉस ने सुरुवातीला थोडावेळ बघून मग कानामध्ये earphone घालून काहीतरी pink floyd किंवा तत्सम काहीतरी ऐकायला सुरुवात केली. आम्ही मात्र "अगर मेरी याद आये तो मुझे याद कर लेना" पर्यंत पूर्ण बघितला.
मग रात्री कुठेतरी जेवून आम्ही झोपून गेलो, सकाळी उठून दिल्लीला पोचू या आशेने. सकाळी उठल्यावर आम्हाला समजल की आम्ही अजून पंचकुला सुद्धा गाठला नाहीये. त्यानंतर वाटेत एका ठिकाणी टायर पंक्चर झाला. त्यानंतर मग सोनपत पानिपत करत एकदाचे दिल्ली मध्ये पोचलो. कनॉट सर्कस हून मग प्रीपेड रिक्षा करून हजरत निझामुद्दीन ला पोचलो. गरीबरथ निघायला अजून २-३ तास वेळ होता मग मधल्या वेळेत जरा खाऊन-पिउन घेतलं आणि platform वर जाऊन बसलो. लडाख ट्रीप एवढी विलक्षण होती की परत जायची कोणाचीही इच्छा नव्हती. पण या ट्रीप ने आम्ही एवढे गरीब झालो होतो की आता गरीबरथातून प्रवास करण्यावाचून काही उपाय नव्हता.
--

गरीबरथ
गरीबरथ, लालूने नाव बाकी भारी शोधलं आहे. आम्ही पराग गरीब (गरीब में गरीब, पराग गरीब) असल्यामुळे, गरीबरथातही आम्ही chaircar मधे होतो. सीट मात्र आम्हाला चांगल्या मिळाल्या होत्या. समोरासमोर ३-३ अशा ६ मधल्या ५ आम्हाला मिळाल्या होत्या आणि एक कोणीतरी मुलगी होती. जेव्हा तिला समजलं की आम्ही सगळे IIT मधे शिकतो तेव्हा एकंदरीत IIT बद्दल तिचा भ्रमनिरास झाला असावा.
कोटा आलं तेव्हा बन्सल क्लासेस मुळे रेल्वेला सुद्धा किती फ़ायदा होतो ते लक्षात आलं. जवळजवळ एक तृतियांश डबा कोट्याला रिकामा झाला. मुख्यत्वे JEE ला बसणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक असा सगळा एक जत्था तिथे उतरला. मग पहाटे ३ वाजता रत्लामनंतर बडोदा आलं आणि गुज्जू प्रमि्तला एकदम भरून आलं. मग तिथे पहाटे ३ला कान्दे-पोह्यांचा कार्यक्रम झाला. म्हणजे ३ प्लेट पोहे घेतले आणि ते ५ जणांनी खाल्ले. नंतर मात्र एकदम सकाळी ७ ला बोरीवली आलं आणि आम्ही सगळे उतरलो. मी तिथून घरी आलो आणि बाकिचे सगळे IITमधे गेले. दहा दिवसांच्या लडाख सफ़रीची सांगता झाली.

लडाख अनुभव: भाग १० - त्सो मोरीरी आणि त्सो कार

आमच्या मूळच्या प्लॅनमधे, मूळ म्हणजे 7B मधे त्सो मोरीरी, त्सो कार नव्हताच. पण हॉटेलवाल्याशी बोलल्यानंतर आखलेल्या 7B-II मधे ते समाविष्ट केलं गेलं. त्यानुसार आम्ही आज लेहधून मुक्काम हलवणार होतो. त्यामुळे सगळ सामान आवरून, हिशोब पूर्ण करून निघायचं होतं. सकाळचा नाश्ता करून, आम्ही निघालो. गेल्या ४-५ दिवसात आम्हाला जरा लडाखच्या वातावरणाची, परिसरची कल्पना आली होती. बराचसा प्रवास सिंधू नदीच्या किनार्याने होत होता. वाटेतच एका ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. तस गरम पाण्याच्या झर्‍यात काही नाविन्य नव्ह्तं पण त्या थंड वातावरणात, सिंधूच्या तीरावर आणि महत्त्वाचं म्हणजे कहितरी चहा किंवा खाण्यासाठी थांबलॊ. चहा मॅगी खाऊन पुढे निघालो. मग काही वेळाने दूपारी त्सो मोरीरीला पोचलो. त्सो मोरीरी हे संरक्षित पाणथळ वन (wetland reserved forest) आहे. तलाव खार्‍या पाण्याचा आहे पण तरीही आजू-बजूला बरीच हिरवळ आहे. पॅंगॉंगपेक्षा हा तलाव लहान आहे. पण इथे ३-४ तर्‍हेचे पक्षी आणि प्राणी बघायला मिळतात. इथले प्राणीही इतरत्र बघायला मिळत नाहीत. तिथे थोडावेळ भटकून त्सो-कार कडे निघालॊ. त्सो-मोरीरी ते त्सो-कार रस्ता म्हणजे मातीची वाट आहे, मधे मधे तो रस्ता चक्क मोकळ्या मैदानातूनच जातो. म्हणजे रस्ता आणि इतर जमीन यात काहिही फ़रकच नाहिये. गाडी जाईल तो रस्ता असा प्रकार आहे. आणि अर्थातच वाटेत कोणीही भेटत नाही. मला उगाचच भिती वाटत होती की आम्ही रस्ता चुकलोय की काय. उन्हं कलत असताना ४-४:३० ला अम्ही त्सो कारला पोचलॊ. त्सो कार हे खरं म्हणजे २ तलाव आहेत. हे दोन्ही तलाव मिळून सुद्धा त्सो मोरीरीपेक्षा लहान असतिल. उशीर होत असल्यामुळे आम्ही एक्दम तलावाच्या काठापर्यंत नाही गेलो. पण लांबून दर्शन घेतलं. तिथे वाटेतच काही तंबू होते.
त्यामधे काही लोक रहत होते तिथे चहाची सोय झाली. संध्याकाळ झालीच होती. तिथून थोड्या वेळांतच आम्ही पुन्हा लेह-मनाली हमरस्त्यावर आलो.खरं म्हणजे लेह-मनाली हा रस्तासुद्धा काही हमरस्ता म्हणण्याच्या लायकीचा नहिये. पण त्यातल्या त्यात बरा इतकच. पांग किंवा सर्चू ला मुक्काम करायचा होता. पण सर्चूला पोचेपर्यंत रात्र झाली असती म्हणून मग पांग ला मुक्काम करायच नक्की झालं. पांग म्हणजे काही तिबेटी रेफ्युजींना सरकारने तंबू बाधायची परवानगी दिली आहे, ते गाव. गाव म्हणजे १०-१५ तंबू असतिल. आमच्यासारखे काही पर्यटक आणि मुख्यत्वे ट्रकचालकांसाठी एक थांबा आहे. बहुतेक पर्यटक सर्चु किंवा किलॉंग ला थांबतात. आम्ही राहिलो तो एक मोठा तंबू होता. खाली सगळीकडे गाद्याच गाद्या होत्या. प्रत्येकाला एक ब्लॅंकेट दिलं होतं. तंबूच्या मुख्य खांबाच्याभोवती वरती दीड-दोन फ़ूट असं वर्तुळाकार भोक होतं ज्यातून थंड हवा आत येत होती. त्यामुळे तंबूत वातावरण तुलनेने उबदार असलं तरी फ़ार काही फ़रक नव्ह्ता. त्यातही सगळ्यांना दूसर्‍यादिवशी सकाळी काय करायचं हा प्रश्न होता. ट्रेकिंगमुळे निसर्गाच्या सानिध्यात उरकायचा अनुभव असला तरी इथला निसर्ग वेगळा होता. त्या कडाक्याच्या थंडीत, मैलोनमैल फ़क्त सपाट जमीन दिसते तिथे कसं काय जमवायच हा प्रश्नच होता. शेवटी भल्या पहाटे उठून किलॉंग गाठू मग बघू अस ठरलं. त्याप्रमाणे ४ला उठून पांग सोडलं आणि सर्चू पार करून बारालाचा-ला मधून किलॉंग गाठलं. किलॉंग म्हणजे हिमाचल प्रदेश चा भाग आहे. लडाखमून बाहेर पडतो आणि पुन्हा निसर्ग एकदम बदलून जातो. पुन्हा सगळीकडे झाडं-झुडुपं दिसू लागतात.
हा रस्ता रोहतांग पास मधून जातो. ऑगस्टमधे रोहतांग मधे काहिही बर्फ़ नव्ह्ता तरिही पर्यटकांची बरीच गर्दी होती. आम्ही लडाखची तथाकथित साहसी मोहिम करून इथे आल्यामुळे अजूनही आमची गाडी दशांगुळे वरूनच चाललेली होती. त्यामुळे त्या य:किंचित शूद्र मानवांकडे दूर्लक्ष करून आम्ही पुढे निघालॊ. पण तरिही एका शूद्र मानवाने आमचं लक्ष वेधून घेतलं. तिथे बर्फ़ाचा एक कणही नसताना, त्या खडकाळ मैदानात नखशिखांत fluorescent नारिंगी रंगाचा रेनकोट घालून एक माणूस चालला होता. श्रीरंग एकदम म्हणाला Huston, we have a problem" आणि एकदम हास्याची लकेर उमटली.
गाडी थांबवून त्या माणसाचा फोटो काढला गेला. काहिही कारण नसताना तो अनोळखी माणूस आमच्या आल्बमधे आहे. अर्थातच याची त्याला कल्पनाही नसेल.
मग आम्ही ट्रॅफ़िक मधून वाट काढत काढत मनाली ला पोचलो. सरळ SBI विश्राम्गृहात गेलो आणि गादीवर अंग टाकलं.

लडाख अनुभव: भाग ९ - लडाखी खाद्य-जत्रा

संध्याकाळी लेह च्या मार्केटमधून चक्कर मारायला बाहेर पडलो. श्रीरंगची तब्येत बरी नसल्यामुळे तो आला नाही. तर जवळच एक धाबा वजा हॉटेल दिसलं. आम्ही आधी चहा घ्यायला म्हणून गेलो होतो. पण समजलं की ते एक स्पेशल लडाखी फ़ूड देणारं होटेल होतं. एक लडाखी बाई आणि तिची मुलगी ते चालवत होत्या. खरं म्हणजे मला जेवणामधे फ़ार प्रयोग करायला आवडत नाही. पण आता लडाख मधे आलोय तर इथलं स्पेशल खाऊन बघूया या आग्रहाला बळी पडून मी तयारी दाखवली. आणि आम्ही काही फ़ार विचार न करता चौघांनी चार वेगवेगळ्या डिश मागवल्या. ठेंगशुक, चुतागी आणि असेच काही शब्द अशी होती. त्या बाईने फ़ार कौतुकाने आम्हाला त्या डिश काय असतात, त्यात काय असतं ते समजावून सांगायचा प्रयत्न केला. आम्ही उगाचच छान छान म्हणून माना डोलवल्या. त्यानंतर अर्धा-पाउण तास काहिही झालं नाही. मागे बसलेले काही लोकं मनालीहून मोटरसायकलवरून आले होते त्यांची चर्चा ऐकण्यात गेला. आणि मग ते चार पदार्थ आले. ते पदार्थ म्हणजे ४ वाडगी होती. त्यात काहितरी सूपसदृश्य द्रव पदार्थ होता. त्यात पालक सदृश पानं तरंगत होती. पहिला घोट/घास घेतला मात्र.. एवढा बेचव पदार्थ मी आयुष्यात खाल्ला नव्हता. पदार्थ खूप गोड, खूप तिखट असू शकतो पण तो खूप बेचव होता. समिर ला वाडग्याबरोबर एका थाळीमधे दोन पाव सदृश गोष्टी दिल्या होत्या. त्या ना भाजल्या होत्या, ना तळलेल्या होत्या. सरळ मैद्याचा गोळा दिल्यासारखं काहितरी ते होतं. मात्र प्रमित आणि आनंद दोघांनाही त्यांना आलेले पदार्थ खूप आवडले होते. पण मला तरी चारही पदार्थ सारखेच बेचव लागत होते. प्रमित आणि आनंदने चवी-चवीने ते खाऊन संपवले. मी आणि समिरने एकमेका सहाय्य करत ते संपवल्यासारखं केलं. आणि आम्ही बाहेर पडलो.

लडाख अनुभव: भाग ८ - पॅंगॉग त्सो


आज पॅंगॉंग तलाव बघायला जायचं होतं. त्सो म्हणजे लडाखी भाषेत तलाव. पँगॉगला जायची अजून एक भानगड आम्हाला समजली. ड्रायव्हरने सांगितल्याप्रमाणे रस्ता एका झर्‍यावरून जातो. जसा दिवस उजाडतो, उन्हं चढतात तसं बर्फ़ वितळल्यामुळे झर्‍यामधलं पाणी वाढतं आणि रस्ता बंद होतो. त्यामुळे जास्त दुपार होण्यापुर्वी जाऊन परत यायचं होतं नाहीतर तिथेच अडकून पडाव लागलं असतं.
त्यामुळे आजही अंतर कमी असूनही पहाटे लवकरच निघावं लागलं. पॅंगॉंगचा रस्ता चांग-ला मधून जातो. हा रस्ता खार्दूंगला इतका महत्त्वाचा नसल्यामुळे इथे रहदारी कमी आणि त्यामुळे फ़ारशी देखभालही होत नाही. सकाळी लवकर निघाल्यामुळे आम्ही या चांग-ला मधे सकाळी लवकरच पोचलो आणि एक दूसरीच समस्या समोर आली. चांग-ला सुद्धा जवळावळ १७००० फ़ूट उंचावर आहे. त्यामुळे इतक्या सकाळी रस्ता पूर्ण बर्फ़ाने भरून गेला होता. सुरवतीला बर्फ़ कमी होता आणि आधी नेहमीच्या रहदारीमुळे तयार झालेल्या गाडीवाटेवर, गाडीवाटेवर म्हणजे पूर्ण रस्त्यावर नव्हे तर फ़क्त गाडीची चाके जातात त्या दोन बर्फ़ नसलेल्या रेषा तयार झाल्या होत्या, त्यातून गाडी जात होती. पण जरा पुढे गेल्यावरच आम्हाला दिसलं की जवळ जवळ संपूर्ण रस्ताच बर्फ़ाने भरून गेला आहे. आणि त्यात एक क्वालिस अडकून पडली होती. म्हणजे गाडी पुढे जायच्या ऐवजी फ़क्त मागची चाके डावी-उजवीकडे बर्फ़ावरून घसरत होती. रस्त्याच्या एका बजूला दरी होती आणि बर्फ़ामुळे नेमका रस्ता कुठपर्यंत आहे याचा अंदाज येत नव्ह्ता. त्यामुळे परिस्थिती कठिण होती. शेवटी थोडा वेळ प्रयत्न करून त्याने गाडी मागे घेतली पण मागे आमची गाडी होती. मग आमच्या ड्रायव्हर ने गाडी मागे घेतली आणि जरा जागा बघून डोंगराच्या बाजूला बर्फ़ावर घातली. क्वालिस मग रस्त्यावरून मागे गेली. आता आमचा ड्रायव्हर आमचं नशीब आणि त्याचं कसब अजमावणार होता. त्याने गाडी घातली पण पुन्हा तेच. मगाशी आम्ही क्वालिसची ’फ़ट रही है’ म्हणत होतो. पण आता आमचीच वाट लागली होती. आपल्या खालची गाडी पुढे किंवा मागे जायच्या ऐवजी डावी-उजवीकडे सरकते हा प्रकार भयप्रद होता. आम्ही ड्रायव्हर अंकलना आम्ही उतरू का असं विचारूनही पाहिलं त्यात त्यांना मदत करण्यापेक्षा आपण गाडी तून बाहेर पडाव असा हेतू होता. पण ड्रायव्हर अंकलनी आम्हाला थोपवून ठेवलं. त्यांच म्हणणं होतं की जास्त वजनामुळे चाकाखलचं बर्फ़ वितळून लवकर रस्ता तयार होईल. त्या स्ट्रॅटेजीनुसार त्यांनी बर्फ़ावर गाडी पुढे न्या आणि अडकली की मागे आणा असा प्रकार सुरु केला. असं ८-१० वेळा केल्यावर एकदाची गाडी त्यातून सुटली आणि आम्हीही सुटलो. ड्रायव्हर अंकलबद्दल आमचा आदर वाढला.
चांग-ला क्रॉस केल्यावर पुढचा प्रवास आरामात झाला. आणि मग ’तो’ झरा आला. आम्हाला वाटलं होतं की आपण काहितरी पूल वगैरे पार करून जाणार. पण प्रत्यक्षात झरा हाच रस्ता आहे. गाडी त्या झर्‍यातूनच काही अंतर जाते आणि मग बाहेर पडते. लडाख म्हणजे बघावं ते नवलच असं आहे. तो झरा पार केला आणि पुढचं नवल दिसलं - पॅंगॉग त्सो. लांबच लांब पसरलेला नि्ळ्या-हिरव्या पाण्याचा विस्तीर्ण तलाव. तलावाचं सौंदर्य अवर्णनीय आहे. निळ्या रंगाच्या डोळ्यांना ओळखता येतील त्या सर्वच छटा इथे दिसतात. काप्रीच्या निळाईच पुलंनी केलेलं वर्णन जसच्या तसं इथे लागू होईल. पाणी एकदम थंड आणि पूर्ण पारदर्शक आहे आणि खारं आहे. पाण्यात मासे वगैरे काही दिसत नाहीत. तलावाचा १/३ हिस्सा भारतात आणि बाकीचा चीनच्या ता्ब्यात आहे. त्यामुळे लष्कराचं एक outpost इथे आहे. त्या निळाईच्या सानिध्यात वाटेल तेवढा वेळ घालवता येऊ शकतो. किनार्‍यावरचे अनेक दगड पाण्यात फ़ेकून झाल्यावर ड्रायव्हर अंकलनी सांगितल्या प्रमाणे आम्ही गाडीत येउन बसलॊ. परतिचा प्रवास सुरू झाला.
आज त्यामानाने लवकरच लेहमधे परत आलो. त्यामुळे लेह मधलं विजयस्मारक बघितलं. भारतिय पायद्ळ आणि वायुदलाचं असं एकत्र कायम स्वरूपी संग्रहालय आहे. लेहच्या विमानतळावर पहिलं विमान उतरवणारा वायुदलाचा वैमानिक मराठी होता हे ऐकून जरा आनंद झाला. सैनिकांनी युद्धात किंवा अतिरेक्यांकडून हस्तगत केलेल्या शस्त्रांच प्रदर्शनही आहे. आणि ती सर्व हत्यारं हाताळता येतात. साधं पिस्तोलसुद्धा किती जड असतं हे बघता येतं. फ़क्त कॉम्प्युटर गेम मधे बघितलेली sniper gun प्रत्यक्ष हाताळता येते. त्या बंदूकीला जोडलेल्या दूर्बिणीतून दिसणारं दृश्य खरोखर अविश्वसनीय होतं. किमान IGI खेळलेल्यांनी तरी एकदा ते बघावचं. कारगिल युद्धात बलिदान केलेल्या सैनिकांच एक स्मारकही तिथे आहे. तिथे अनेक सैनिकांनी केलेली अलौकीक कामगिरी वाचून मन भरून येतं. त्यांना एक सलाम करून आम्ही जवळच्या एका देवीच्या देवळात गेलो. हे मंदीर खूप जुने आहे. तस बघण्यासाठी खूप काही आहे असं नाही. पण जरा उंचावर असल्यामुळे लेह ची ’skyline' दिसते. दृश्य छान दिसतं.

लडाख अनुभव: भाग ७ - नुब्रा आणि हुंदेर

खार्दूंग-ला मधून आम्ही नुब्रा मधे आलो तोपर्यंत सगळ्यांचा उत्साह कमी झाला होता. सकाळी ४ ला उठल्यामुळे आता झोपही येत होती. मी, बॉस आणि अर्थात ड्रायवर जागे होतो बाकी झोपले होते. मला बस लागते, जीपमधे सुद्धा मागे बसलं तर मला त्रास होतो. पण इथला रस्ता एवढा वळणावळणांचा होता की मला पुढे बसून सुद्धा त्रास होत होता. म्हणून मी पण मग झोपायचा प्रयत्न सुरू केला. नशिबाने मलापण झोप लागली आणि बाकी काही त्रास झाला नाही. ड्रायव्हरच्या बाजूला बसून झोपणं तसं रिस्की होतं. पण आमचा ड्रायव्हर अंकलवर पूर्ण विश्वास होता! आम्ही सगळे उठलो ते एकदम दिस्कीतला. दिस्कीतला एक मॉनेस्ट्री आहे. पण हेमिसची मॉनेस्ट्री बघितल्यावर आमचा मॉनेस्ट्रीबद्दल उत्साह आवरला होता. त्यामुळे ही मॉनेस्ट्री डिच करायचं ठरलं. पण आता पेटपूजा करणं आवश्यक होतं. त्यातच आम्हाला ड्रायवर अंकलनी सांगितलं की खार्दूंगला चा रस्ता आता बंद झालाय त्यामुळे आता कदाचित इथेच मुक्काम करावा लागेल. मग आता हुंदेरला जाऊ आणि परत येताना बघू काय परिस्थिती आहे असं ठरवून आम्ही हुंदेरसाठी निघालो. अर्ध्या तासात आम्ही हुन्देरला पोचलो.
हुंदेर प्रसिद्ध आहे ते वाळूच्या टेकड्या आणि वैशिष्ट्यपूर्ण दोन कुबड असलेल्या उंटांसाठी. त्या दोन कुबड असलेल्या उंटावर फोटो काढून पुन्हा एकदा आम्ही लडाखला जाऊन आल्याचा आणखी एक पुरावा तयार केला. आणि मग आम्ही Sand dunes वर खेळण्यासाठी पळालो. या वाळूच्या टेकड्या वार्‍यामुळे तयार होतात आणि वार्‍याबरोबर जागाही बदलतात. ज्या दिशेने वारा वहातो त्या दिशेला कमी पण लांब चढण आणि विरूद्ध बाजूला तीव्र उतार अशी रचना होते. मग त्या उतारावरून खाली येणे, वर जाणे याच्या शर्यती झाल्या. त्यात मी, प्रमित आणि बॉस धावत उतरत असताना, समिर अंकल विडीओ काढत होते. आणि तो "proper youtube video" निघाला. झालं असं की मी, प्रमित आणि बॉस शर्यत लावून पळत होतो. वरून खाली येत असताना माझा पाय वाळूत अडकला, मी उतारावरून जवळ जवळ पूर्ण खाली आलो होतो त्यामुळे वेग बराच होता त्यामुळे मी एकदम तोल जाऊन पडलो. समोर सगळे दगड धोंडे पसरलेले होते. मी जरा आधी पडलो होतो त्यामुळे वाळूमधे पडलो होतो आणि बचावलो होतो नाहीतर कपाळमोक्ष नक्की होता. तो जेमतेम अर्ध्या मिनीटाचा विडिओ बघताना अजूनही हसून-हसून पुरेवाट होते.
हुंदेरच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या थोड्याशा जागेत वाळवंट आहे, बाजूनेच नदी वहाते आहे, तिथे हिरवळ आहे, त्याच्यापुढे पुन्हा उघडे बोडके डोंगर आहेत आणि जरा दूर बघितल तर उंच डोंगर बर्फाच्छादित आहेत अशी अनेक रूपं थोड्याशा जागेत पहायला मिळतात.
परत दिस्कीतला येईपर्यंत समजलं की आता रस्ता मोकळा झाला आहे. तेव्हा मग आम्ही सरळ लेह चा रस्ता धरला. पुन्हा नॉर्थ चेकपोस्ट, खार्दूंग ला साउथ चेकपोस्ट करत परत लेह ला आलो. इथे साउथ पोस्ट ला चहाच्या टपरीवर एक सैनिक भेटला. तो होता उडिसामधला. त्याला त्या भागात आमच्यासारखे "भारतिय" बघून आनंद झाला. आणि त्यातही मुंबईचे विद्यार्थी आहेत हे ऐकून अजूनच आनंद झाला किंवा तसं आम्हाला तरी वाटलं. मग त्याने तो सियाचेन ला असतानाच्या गोष्टी ऐकवल्या. सियाचेन मधे करिवास मधे माणूस गेला तर कसं काही करता येत नाही, याची गोष्ट ऐकवली. तिथे स्ट्रिक्ट ऑर्डर असतात की कोणी सैनिक करिवास मधे गेला तर त्याला पूर्ण कल्पना आल्याशिवाय कोणीही मदतीला जायच नाही. आणि वाचवणं शक्य नसेल तर त्याला तिथेच सोडून जातात. यात गोंधळ असा झाला की आम्हाला कोणालाही हे करिवास काय भानगड आहे समजेना. शेवटी ते करिवास म्हणजे crevice असणार असा निष्कर्श निघाला. पण त्यामुळे त्या Vertical Limit चित्रपटामधला अनुभव प्रत्यक्षात घेणार्‍या माणसाच्या भावना पोचल्या पण थोड्या बोथट होऊन.

लडाख अनुभव: भाग ६ - खार्दूंग ला

लहरी हवामानामुळे रस्त्यांची काही शाश्वती नाही, दूर-दूर पर्यंत कुठे काही खायला-प्यायला मिळेल याची काही खात्री नाही. त्यामुळे लडाख मधे कुठेही जायचे झालं तर सकाळी लवकर निघणं केव्हाही चांगलं. त्याप्रमाणे लवकर उठून टोमॅटो आम्लेट, चहा घेऊन निघालो. आमच्या एक्स्पर्ट ड्रायवर अंकलनी लेह मधून बाहेर पडून खार्दूंग ला च्या रस्त्याला लागणारा कुठलासा शॉर्टकट मारला होता. त्या रस्त्यासदृश भूभागावरून थोड्यावेळांत आम्ही मुख्य रस्त्याला लागलो. रस्ता टेकड्यांवरून हळूहळू वर वर चालला होता.
जसजशी उंची वाढायला लागली तसतसे दूरचे बर्फाच्छादीत डोंगर जास्त स्पष्ट दिसायला लागले. सकाळची वेळ होती त्यामुळे सूर्याचा नारींगी प्रकाश त्या डोंगरांवर पडून परावर्तित होत होता. त्यामुळे ते सोनेरी चकाकणारे डोंगर छानच दिसत होते. एका ठिकाणी, "क्या सही दिख रहा है" असं म्हणून थांबून फोटो सेशन झाल्यावर, पुढच्याच वळणावर अजून छान दृश्य दिसत होतं, पुन्हा थांबून फोटो सेशन अस दोन-तीन वेळा झाल्यावर, सगळ्यांची हौस भागली. आणि मग आम्ही एकदम खार्दूंग ला च्या दक्षिण बिंदूवर येऊन पोचलो. खार्दूंग, ला म्हणजे खिंड (pass), ही लष्करी दृष्ट्या फ़ार महत्त्वाची आहे. सियाचेन ला जाणारा रस्ता हा खार्दूंग ला मधून जातो. त्यामुळे त्यावर लष्कराचे पूर्ण नियंत्रण आहे. खिंडीच्या उत्तर आणि दक्षिण बाजूला लष्कराची चेक-पोस्ट आहेत. तिथून परवानगी दिली तरच खार्दूंग ला मधून जाता येतं. ही परवानगी हवामान, लष्कराची वाहतुक या दोन्ही गोष्टींवर अवलंबून आहे. तिथे एक चहापान सत्र झालं तोपर्यंत ड्रायवर अंकलनी तिथल्या चौकीत एन्ट्री करून आले. मग खार्दूंग ला मधला प्रवास सुरू झाला. एकूणच लडाख मधले सगळेच रस्ते हे घाटरस्ते असल्यामुळे या रस्त्याच काही विशेष असं काही वाटत नव्हतं. पण अधून-मधून दिसणारा बर्फ़ आता सर्वत्र दिसत होता. मग आम्ही खार्दूंग ला च्या सर्वात उंच टोकावर पोचलो. तिथला तो "Highest Motorable Road in The World" चा फ़लक सगळ्यांनी आधी टिव्हीवर बघितला होता. त्यामुळे गेल्या-गेल्या तिथे जाऊन त्याच दर्शन घेतलं आणि त्याच्याबरोबर फोटो काढून आम्ही कृतकृत्य झालो.
पुरावा
आता आमच्याकडे लडाखला जाऊन आल्याचा पुरावा होता आणि तोसुद्धा फोटोशॉपशिवाय! तेवढ्यात आम्हाला समजलं की तिथल्या एका चौकीमधे चहा मिळतोय त्यामुळे सगळे तिथे वळले. आमचा आनंद द्विगुणित झाला जेव्हा आम्हाला समजलं की तो फुकट आहे. पण तो चहासद्रुष्य द्रवपदार्थ बघून आमचा आनंद पुन्हा अर्धा-गुणित झाला. पण गारठलेल्या हातांमधे कही गरम वस्तू पकड्ण्याचा आनंद होताच. तो संपवल्यावर बाहेर पडून बर्फामधे खेळण्याचा कार्यक्रम झाला. त्यात दमछाक झाल्यावर गाडीमधे बसून पुढचा प्रवास सुरू झाला. जरा पुढे गेल्यावर समजलं की पुढे बर्फामुळे रस्ता बंद झाला आहे पण तो मोकळा करण्याच काम चालू आहे. त्या चहामुळे आणि खेळण्यामळे भूक चाळवली होतीच त्यात आता नुसतं बसण्यामुळे काहीतरी तोंडात टाकायला हवं होतं. आम्ही मागच्या २ दिवसांच्या अनुभवामुळे यावेळेला ब्रेड-बटर बरोबर आणलं होतं. ते खाऊन झालं. तो पर्यंत रस्ता मोकळा झाला आणी गाडी निघाली. नंतर सरळ आम्ही उत्तर बिंदूवरून बाहेर पडलो म्हणजे आता अम्ही खार्दूंग ला ओलांडून नुब्रा खोर्‍यात प्रवेश केला होता.

लडाख अनुभव: भाग ५ - लेह

प्लॅन 7B-II नुसार आजचा दिवस तुलनेने आरामाचा होता. लेह आणि आजूबाजूचा परिसर बघायचा प्लॅन होता.
सकाळी ठरल्याप्रमाणे ९-९:३० ला गाडी आली. आता प्रवास स्कॉर्पिओमधून करायचा होता.
सर्वात प्रथम निघालो ते हेमिस मॉनेस्ट्री कडे. लेह-मनाली रस्त्यावरच लेहपासून ~२५ किमी वर ही मॉनेस्ट्री आहे. लडाख परिसरातील ही सर्वात मोठी मॉनेस्ट्री. बराचसा रस्ता सिंधू नदी किनार्‍याने जातो आणि नंतर सिंधू नदी ओलांडून पलिकडे डोंगरात हे मंदीर आहे. रस्त्यावरून चटकन दिसूनही येत नाही. नदी ओलांडल्यानंतर मात्र रस्त्याच्या बाजूने अनेक लहान-लहान खाचरांमध्ये गव्हाची शेती केलेली होती. नुकत्याच त्यांना लोंब्या फुटल्या होत्या. त्या बाकी उजाड टेकड्यांवर ही हिरवी शेतं फ़ारच सुंदर दिसत होती. हेमिसचे मंदीर आहे मात्र प्रचंड. मुख्य प्रार्थना मंदीरात अनेक भव्य चित्रे रंगवलेली आहेत. या मंदीराला लडाखच्या दृष्टीने ऐतिहासिक महत्त्वही आहे. लडाखच्या नामग्याल वंशाच्या राजांनी त्याचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे. मंदीराच्या परिसरातच एक मोठे संग्रहालय आहे. त्यात अनेक जुन्या वस्तू, चित्रे, दस्त-ऐवज ठेवले आहेत. दूर्दैवाने मुळातच बौद्ध पुराण कथा, जातक कथा वगैरे संबंधी फ़ारशी माहिती नसल्यामुळे याचा पुरेपूर आनंद घेता येत नाही. जाताजाता तिथल्या एका छोट्या लामाबरोबर सगळ्यांचा एक फोटो काढून घेतला. त्या लामालाही बहुतेक सवय झाली असावी. तो बिचारा लोकं सांगतिल तसा उभा रहायचा.
त्यानंतर आमच्या या नविन ड्रायव्हर अंकलनी नेलं ठिकसे मॉनेस्ट्रीमधे. खरं म्हणजे ती हेमिसची मोठी मॉनेस्ट्री बघून आणि त्यातलं काही फारसं न समजल्यामुळे मॉनेस्ट्री बघायचा उत्साह मावळला होता. त्या मॉनेस्ट्रीसमोरील डोंगर आम्हाला जास्त खुणावत होता. शेवटी मॉनेस्ट्रिला टांग देऊन त्या डोंगराकडे मोर्चा वळवला. लडाखच्या टेकड्या आणि सह्याद्रीमधले डोंगर यातला फ़रक लगेचच लक्षात आला. लडाखमधले डोंगर म्हणजे खडी रचून ठेवल्यासारखे आहेत. कुठेही हात लावला किंवा पाय ठेवला की सरळ घसरत खाली येतात. आणी ते वाळूसारखे मऊ सुद्धा नाही, त्यामुळे घसरून पडणं म्हणजे कपडे फाटून रक्तबंबाळ व्हायची शक्यता. तरीही डोंगराच्या अर्ध्या-पाऊण उंची पर्यंत जाऊन आलो.
हा उपद्व्याप केला आणि मग मात्र आम्हाला AMS म्हणजे Acute Mountain Sickness चा त्रास जाणवू लागला. मुंबईसारख्या सपाट प्रदेशातून जेव्हा लेह सारख्या १०००० फ़ूटांवर पोचतो. तेव्हा हवा विरळ होते, त्यामुळे शरीराला श्वासातून मिळणार्‍या प्राणवायूचं प्रमाण कमी होते. त्यामुळे डोके दुखणे, मळमळणे, दम लागणे असे प्रकार होतात. आणि अपवादात्मक स्थितीत फुप्फुसामध्ये किंवा मेंदू मधे पाणी जमणे असे होऊ शकते. त्यामुळे साधरणपणे लेहला पोचल्यावर एक दिवस आराम करावा जेणेकरून शरीराला विरळ हवेची सवय होईल, असा सल्ला दिला जातो. पण आम्ही रस्ता मार्गाने जाणार होतो त्यामळे AMS चा आपल्याला काही फ़ारसा फ़रक पडणार नाही असा विचार केला होता. तसा आतापर्यंत काही त्रासही झाला नव्हता. पण या धावपळी मुळे सगळ्यांनाच खूप दम लागला, डोकी दुखायला लागली.
त्यानंतर गेलो शे पॅलेस बघायला. हा मुळात एक जूना पडका किल्ला आहे. महाराष्ट्रामधल्या किल्ल्यांसारखाच आहे. इथे गौतम बुद्धाची एक भव्य मूर्ती आहे. नामग्याल राजांच्या भरभाराटीच्या काळात मूर्ती हिर्या मोत्यांनी मढवलेली होती. पण आता जुनं वैभव लोप पावलं आहे. या रस्त्यावरच एक धोकादायक वळण आहे, त्याला नाव दिलय, "कॅ. शिंदे मोड". कॅ. शिंदेंचं तिथे एका अपघातात निधन झालं, त्यांच्या नावाची एक फलकही आहे तिथे.

मग लेहला परतून जरा उन्हं कलल्यावर शांतिस्तूप आणि लेह पॅलेस बघायला बाहेर पडलो. शांतीस्तूप म्हणजे गौतम बुद्धाच्या मूर्ती असलेला स्तूप आहे. पूर्ण लेह शहराचा बर्ड-आय दृश्य छान दिसत. लेह पॅलेस एक खरच प्रेक्षणीय आहे. पूर्वी हा वाडा सात मजली होता. अजूनही सात मजले उभे आहेत पण काही भाग कोसळला आहे. पुरातत्व खाते तिथे सध्या पुनर्बांधणीचे काम करत आहे. मा्तीच्या वीटांचे बांधकाम आहे. स्लॅबची रचना बघण्यासारखीच आहे. केवळ, लाकूड आणि मातीच्या विटा वापरून सात मजली रचना करण्याचे कौशल्य नक्कीच वाखाणण्यासारखे आहे. या वाड्याची रचना, ल्हासामधल्या दलाई लामांच्या पोताला वाड्यासारखीच आहे अशी माहिती मिळाली.
दुसर्‍या दिवशी खार्दूंग ला मधून नुब्रा व्हॅलीमधे जायचे होते, त्यामुळे सकाळी ४ ला उठणे भाग होते. त्यामुळे लवकर जेवून ताणून दिली.

लडाख अनुभव: भाग ४ - टीचर अंकल

सकाळी ५च्याही आधी, श्रीनगरमधून निघालो. आता दाल सरोवराच्या दुसर्‍या बाजूने, हजरतबल दर्ग्यावरून निघालो. भल्यापहाटे नीरव शांतता थंड हवा. जरा उजाडले तसे आम्हाला समजले की आम्ही तो संवेदनशील गंधारबाल जिल्हा पार केला आहे. आता काही प्रॉब्लेम नाही. मग आम्ही सगळेच तणावमुक्त झालो. काश्मिरच्या सौंदर्याचा खर्‍या अर्थाने आस्वाद घेऊ लागलो, मनाला येईल तसे कॅमेरे क्लिक व्हायला लागले.
जवळजवळ दोन तासांचा प्रवास झाला होता, सगळ्यांनाच चहाची हुक्की आली होती. ड्रायव्हर मुदस्सर, ज्याचा आता 'टीचर अंकल' झाला होता. कालपासून त्याने एवढ्या सूचना दिल्या होत्या की आता फ़क्त दोन-दोनच्या जोडीने चला हेच सांगायचं बाकी राहिलं होतं. टीचर अंकलनी आपण सोनमर्गला थांबू असं जाहिर केलं. पुढे १५-२० मिनिटांत सोनमर्ग आलं मग तिथे गरम-गरम चहाचा कप हातात घेऊनच एक छोटी चक्कर मारून आलो. तेवढ्यात टीचर अंकलनी, "चलो" अस फ़र्मान काढलं. हेही खरं होतं की लेह पर्यंत जायच होत म्हणजे थोडी घाई करायला लागणारच होती.
सोनमर्ग सोडलं आणि महामार्गावरील लष्करी तळांची संख्या वाढायला लागली. एवढा वेळ दूर दिसणारे हिमालयाचे पहाड जबळ यायला लागले. हे पहाड ओलांडले की आम्ही काश्मिर खोर्यातून लडाख मधे शिरणार होतो. आणि त्यांना जोडणारा रस्ता म्हणजे इतिहास प्रसिद्ध 'झोजी ला'. झोजी ला त्याच्या सर्वोच्च ठिकाणी १४२०० फ़ूटावर जातो. विरळ झालेली हवा आणि थंडी लगेचच जाणवू लागते.
झोजी ला सोडले आणि आम्ही द्रास खोर्‍यात उतरलो. द्रास हा कारगिल जिल्ह्याचा भाग आहे. झोजी ला ओलांडली आणि जमिन, डोंगर आणि झाडांमधला फ़रक लगेच जाणवू लागतो. उघडे-बोडके डोंगर, खडकाळ जमिन आणि खुरटी झाडे.  रस्ता द्रास आणि पुढे कारगिल पर्यंत सुरवातीला चिनाबच्या आणि नंतर द्रास नदीच्या काठा-काठाने जात रहातो. इथे खुरट्या गवतावर शेळ्या-मेनद्या चरत होत्या. त्यातल्या एका शेळीची शिंगं बघून प्रमितने sing is king , sing is king हे गाणं गायला सुरुवात केली आणि ते गाणं पूर्ण ट्रिपच घोषवाक्य बनून गेल.
लडाखमधील सगळेच रस्ते Border Road Organization (BRO) नी बांधले आहेत आणि देखभालीची जबाबदारीही त्यांच्याकडेच आहे. त्यांनी लावलेल्या पाट्यांवरील विनोदी वाक्यं वाचत वाचत, लष्कराच्या कॅरावान मधून वाट काढत काढत आम्ही कारगिल ला पोचलो. कारगिल हे जिल्ह्याच ठिकाण आहे. सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेजे, छोटी हॉटेले असं गजबजलेले ठिकाण आहे. नाहीतरी जेवायची वेळ झालीच आहे तर आता इथे एक तासभर काढून जेवून निघायचे अस ठरवून आमची पंचकडी कारगिल दर्शनाला निघाली.
लडाखसाठी गुगल करताना मिळालेले "Kargil - Vegetarian's Hell" हा ब्लॉग सगळ्याना आठवला. कारगिलमधे शुद्ध शाकाहारी हॉटेल तर सोडूनच द्या पण शाकाहारी जेवण जिथे मिळेल अशी हॉटेलेही नाहित. एकमेव शीख सरदारजी एक खाणावळ चालवतो, तिथे भात, राजम्याची उसळ आणि लोणचं असं जेवण मिळाले. आणि त्या ब्लॉगमधे नसलेली एक गोष्ट समजली ती म्हणजे ती भुक्कड भात-राजम्याची थाळी आम्हाला ५० रूपयांना पडली होती. दुसरा काही पर्याय नव्हता, मुकाट्याने २५० रुपये देऊन आम्ही बाहेर पडलो.
टीचर अंकलही जेवून आले होते, गाडीतही डिझेल भरलं आणि पुढे प्रवास सुरू झाला.
कारगिल ते लमायुरू हा प्रवास म्हणजे लडाखचं पहिलं अस्सल दर्शन. क्षितीजापर्यंत पसरलेल्या डोंगररांगा, त्यातून जाणारा रस्ता. रस्त्यावर किंवा डोंगरांवर चुकून एक हिरवं पान नाही. मैलोनमैल एक माणूस नाही की एक गाडी नाही. मधेच एखाद ३-४ घरे असलेले एखादं गाव. सजीव सृष्टीच जे काही दर्शन होईल ते त्या गावांतच. झाडं माणसाच्या आधारावर जगत असल्याच हे पृथ्वीतलावरच एकमेव उदाहरण असावं.
कारगिल पासून ३-४ तासच्या प्रवासानंतर लमायुरू आले. लमायुरूला बौद्ध मॉनेस्ट्री आहे. मी आणि समीरने याआधी सिक्कीममध्ये बौद्ध मॉनेस्ट्री बघितल्या होत्या. त्यावरून आमच्यापैकी कोणालाही त्यात फ़ार काही बघण्यासारखं नसतं असं मत झालं. आणि लेहजवळ असलेली हर्मिसची मॉनेस्ट्री आम्ही बघणार होतो़च, त्यामुळे इथे थांबावे की नाही अशी चर्चा करत असतानाच, टीचर अंकलनी इथे काही बघण्यासारखं नाही असं म्हणून गाडी सुरुही केली. टीचर अंकलना आता लेहला जायची घाई झाली होती. पण किमान चहासाठी तरी थांबूया यावर मात्र ते तयार झाले. मग जवळ्च्या टपरीवर चहाची ऑर्डर दिली. जरा बाजूला बघितलं तर पिवळ्या-नारिंगी फळांनी डवरलेले एक झाड दिसलं. बघतो तर काय, ती फळ म्हणजे जर्दाळू होते. मुंबईत २०० रू. किलोने मिळणारे जर्दाळू म्हणजे हिच फळ. ते सुकवलेले असतात इथे ओले झाडावर दिसत होते. मग एका चिमुअरड्या पोरीकडून काही जर्दाळू विकत घेतले. ते खात-खात फोटो-सेशन झालं आणि पुढच्या प्रवसाला सुरूवात झाली.
आता आमचा प्रवास झांस्कर नदीच्या किनार्‍याने प्रवास सुरू झाला.
या रस्त्यावर एक मॅग्नेटिक हिल नवाची जागा आहे. मुख्य रस्त्यावरच ही जागा आहे. रस्त्याला उतार आहे, पण जर गाडी न्युट्रलमध्ये ठेवली तर गाडी चढणीच्या दिशेने जाऊ लागते. खात्री करण्यसाठी आम्ही थोडं अंतर चालूनही बघितलं, चढण त्याच बाजूला होती. गाडी न्युट्रलमध्येच होती. हा एक नैसर्गिक चमत्कारच आहे हे खरं. त्यामागच्या विज्ञानाचा शोध घ्यायला हवा. त्याचा एक व्हिडिओही काढला. एक फोटो सेशन झालं.
आता संध्याकाळ झाली होती आणि लेह पण जवळ येत होतं. मैलाचे दगड दोन अंकी झाले होते. रस्ताही जरा चांगला होता. एक शीखांचा लंगर आहे. उशीर झाला तर इथे मुक्काम करा असा back-up प्लॅन आम्हाला कारगिलच्या सरदारजीने सुचवला होता. सुदैवाने ती वेळ आली नाही. लेह आता ट्प्प्यामध्ये होते आणि पुरेसा वेळही होता. तिथेच एका टेकडीवरून सिंधूनदीच दर्शन होते. सिंधू नदीच हे पहिलं दर्शन. सावरकरांच्या आसेतु-सिंधूपर्यंतच्या हिंदू बांधवांची एक आठवण आली. दिवसभरच्या प्रवासाचा थकवा, संध्याकाळची वेळ, दहा हजार फ़ूट ऊंची आणि घोंघावता वारा, गाडीच्या बाहेर पाय टाकता क्षणीच सगळे थरथरायला लागले. पण उत्साह उलट अजून वाढलाच होता. सिंग इज किंग पोजमधे फोटो सेशन झाले. टीचर अंकलनी पुन्हा आम्हाला हाकायला सुरुवात केली. मग मात्र आम्ही सरळ लेह मधे पोचलो. रात्र झालीच होती. आता जे मिळतय ते घेऊ, नाही बरं वाटलं तर उद्या बदलू असे ठरवून थोडी फोना-फोनी झाल्यावर खान-मंझिल हे हॉटेल नक्की केलं.
आम्ही कुठल्या मुहुर्तावर हा प्लॅन केला होता देव जाणे, आम्ही चेक-इन केलं आणि लाईट गेले.
मेणबत्तीच्या उजेडात जरा सामान पसरलं. आणि मग लडाख फ़िरण्यची व्यवस्था करायला, haggling expert प्रमित आणि आनंद उर्फ बॉस गेले. मग त्यांनी आणलेल्या प्लॅनवर पाच जणांनी पाच बाजूनी चर्चा केली. अंधारातच पुन्हा प्लॅन 7B बदलून 7B-II आखला. तो हॉटेलवाल्याशी नक्की करून जेवायला बाहेर पडलो.
एक बरसं हॉटेल बघून जेवून परतलो अंथरूणांत अंग टाकलं आणि कधी झोप लागली समजलं नाही.

Sunday, 8 August, 2010

लडाख अनुभव: भाग ३ - सुरवात

मर्फ़ी बाबाच्या नियमाप्रमाणे आम्ही इथे तिकिटे काढली आणि थोड्याच दिवसांत अमरनाथ जमीन प्रकरण उद्भवल. आधी श्रीनगर मधे भडका उडाला आणि तो थंड झाल्यवर जम्मूमधे. श्रीनगर थंड झाल्याचे बघून आम्हाला जरा बरं वाटत होतं. आम्ही उगाचच २-३ वेळा जम्मू-काश्मीर टूरिझमला फोन करून वातावरण कसं आहे याची चौकशी करायचो आणि तेसुद्धा सरकारी खाक्याप्रमाणे सगळं आलबेल असल्याच सांगायचे. त्यातून सत्य परिस्थितीचा अंदाज येत नसला तरी बुडत्याला तेवढाच काडीचा आधार.
शेवटी हो-नाही करता करता, प्रत्येकाने आप-आपल्या आई-वडिलांची समजूत काढून निघायचं नक्की केलं. अमरनाथ प्रकरणामुळे तेही एक मोठं काम झालं होतं. त्यातच नकटीच्या लग्नाला सतरा विघ्ने त्याप्रमाणे ८ ऑगस्टला दीक्षांत सोहळा होता त्यात राष्ट्रपती प्रतिभा पाटिल येणार म्हणून सुरक्षा व्यवस्था चौपट केलेली. त्यामुळे पहाटे रिक्षा आत सोडणार नाही हे समजलं, त्यामुळे मग समिर आणि प्रमित हॉस्टेलपासून चालत मेन गेट ला जाऊन रिक्षा घेऊन आले. त्यात सामान टाकले आणि आमच्या ट्रिपची सुरुवात झाली.
--

विमान मुंबईहून वेळेवर सुटले पण दिल्ली ला काय झाले कुणास ठावूक, एक तास धावपट्टीवरच थांबले.त्यामुळे श्रीनगरला पोचायला एक तास उशीर झाला. बाहेर येऊन JK Tourism च्या काऊंटरवर चौकशी केली, तेव्हा कळलं की कारगिलची बस आता गेली आणि दुसर्‍या दिवशी सकाळी पुढची बस मिळेल. पण प्रिपेड टॅक्सी मिळेल असं समजलं. मग इकडे-तिकडे चौकशी करून घासाघीस करून चार हजार रूपयांत कारगिल पर्यंत जायला एक इनोव्हा मिळाली. सामान भरलं गाडीत आणि मनातल्या मनात गणपती बाप्पा मोरया म्हटलं.
खरं म्हणजे पहाटे ३ला ऊठून आता साडे अकरा पर्यंत पोटात काही न गेल्यामुळे मरणाची भूक लागली होती. पण आमच्या चालकाने अम्हाला, "हालात अच्छे नही है, आज जुम्मॆ का दिन है, २ बजे नमाज का वक्त होता है, कुछ दंगा-फ़साद हो सकता है, हमे पहले गंधरबाल डिस्ट्रीक्ट पार करना चाहिये, उसके बादही हम रूक सकते है" असं सांगितल्यावर कसली तहान आणि कसली भूक असं झालं.
गाडीतून जाताना दाल सरोवर आणि त्याच्या मधोमध असलेली चार चिनारचे वृक्ष बघायला मिळाले. खरं तर तिथे थोडावेळ थांबायची ईच्छा प्रत्येकालाच होत होती पण व्यक्त करायची हिंमत होत नव्हती. गाडी श्रीनगरपासून ४-५ किमी आली आणी गंधरबाल जिल्ह्याची हद्द सुरु झाली. तिथल्या पोलिसाने गाडी अडवली आणि सांगितले की आणखी ४-५ गाड्या एकत्र करा, स्थानिक पोलिसांकडून escort van घ्या तरच सोडेन. हा सगळा प्रकारच अम्हाला नवीन होता. मग तास-दोन तास पोलिस ठाणे आणि ती जिल्ह्याच्या हद्दीवरचं चेकपोस्ट यामधे २-३ चकरा मारून काही मांडवली करायचा प्रयत्न झाला. पण तो अयशस्वी झाला. ड्रायव्हर आणि ईतर लोकांच्या काश्मिरी भाषेतिल चर्चेतून आम्हाला एवढंच समजलं की तो पोलिस-प्रमुख काश्मिरी मुसलमान नाही कोणीतरी नविन बदली होऊन आला आहे.
एक नक्की झाल की त्या दिवशी काही आम्ही कारगिल ला पोचणार नाही. आमच्या प्लॅन 7B चे पहिल्यादिवशीच तीन तेरा झाले होते. ड्रायव्हरशी प्लॅनची चर्चा केल्यावर त्याने अम्हाला पहाटे ४ वाजता निघून रात्रीपर्यंत लेह पर्यंत पोचवायची तयारी दाखवली. मग त्याच्याकडे असलेल्या सुमो आणि इनोव्हा, त्यांचे वेगवेगळे दर, लेह पर्यंतचे अंतर आणि आमचं कोलमडलेले बजेट यासगळ्यावर चर्चा करून घासाघीस करून शेवटी त्यच्याशीच सौदा ठरला. मग त्यानेच दाखवलेल्या एका हॉटेलमधे मुक्काम केला. जवळच्याच एका रेस्टॉरंट मध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर असं एकत्रित काहितरी खाऊन हॉटेलमधे परतलो.

लडाख अनुभव: भाग २ - El Plano

लडाख म्हणजे जम्मू-काश्मीर राज्याचा एक भाग आणि तिथे गवताचं एक पातंही उगवत नाही असा नेहरूंनी केलेला उल्लेख एवढंच माहिती होतं. कुठल्याशा टिव्ही कार्यक्रमांत बघितलेला Highest Motorable Road हे खरं लडाखविषयी कुतुहल निर्माण होण्यास कारणीभूत ठरले. नविन सेमिस्टर सुरु होताना, जानेवारी-फेब्रुवारी मधे, प्रमित मेहता एकदा म्हाणाला,"लडाख जाना है, यार." त्यावर जाना है रे, सुना है अच्छी जगह है" एवढ्यावरच विषय संपला होता. हे जाना है म्हणजे बघू, जमलं तर करू तसंच गुळमुळीत जमलं तर जाऊ अस होतं. पण त्यानिमित्ताने गूगलवर शोध घेताना, लडाखविषयी अनेक साइट आणि फोटो मिळाले. ते बघताना आता खरच जायलाच पाहिजे असे विचार यायला लागले. माझे अजून दो लॅब मधले मित्र समिर आणि आनंद सुद्धा तयार झाले. तसेच प्रमितच्या लॅब मधला श्रीरंगसुद्धा तयार झाला. लडाखचा पर्यटन मोसम म्हणजे एप्रिल ते ऑक्टोबर असा असतो. त्यामुळे MTP स्टेज १ जुलै मधे संपली की मग सेमिस्टर सुरु होता होता जाऊन येता येईल असा विचार झाला. मी आपल्या आतापर्यंतच्या शैक्षणिक अनुभवावरून, डेडलाईनच्या पुढे २ आठवडे मोकळे असावे, म्हणजे extension मिळाले तरी पंचाईत होऊ नये असं सुचवले आणि त्यावर लगेचच एकमत झाले. ऑगस्ट्चा २रा आठवडा असं नक्की झाल. सगळेच विद्यार्थी, त्यामुळे stipend मधून उरलेल्या पैशामधून एवढी मोठी ट्रिप कशी जमवायची हा एक प्रश्न होताच. त्यात पुन्हा एवढ्या लांब जायचं तर सगळं नीट बघायला पाहिजे असं वाटत होतं. लडाखला जायचे २ रस्ते आहेत, एक श्रीनगरहून कारगिल मार्गे लेहला जातो आणि दुसरा मनालीहून रोहतांग-स्पिती खोर्‍यात लडाखमधे येतो. एका रस्त्याने जावं आणि दुसर्‍या रस्त्याने परत यावे असा प्लॅन करायचा होता. मग वेळ, खर्च आणि सोय आणि त्याप्रमाणे बस, ट्रेन किंवा विमान असे वेगवेगळे मार्ग या सगळ्यांतून 'optimal solution' काढायचे प्रयत्न सुरु झाले.
त्यात पुन्हा १५ ऑगस्ट पण त्यामधे येतोय हे लक्षात आलं.खरं तर स्वातंत्र्यदिन म्हणजे अभिमनाचा, आनंदाचा दिवस, पण दूर्दैवाने स्वातंत्र्यदिनी श्रीनगर किंवा दिल्ली मधे न जाणे चांगले अशी परिस्थिती असते. हा सगळा विचार करून प्लॅन 1, प्लॅन 2 अस करता करता प्लॅन 7B नक्की झाला. त्याप्रमाणे मग विमान अणि ट्रेनची तिकिटे काढून झाली. म्हणजे बघू, जाऊ पासून सुरुवात करून आता ८ ऑगस्टला आम्ही जाणार हे तर नक्की झालं.

लडाख अनुभव: भाग १ - फ़टी पडी थी

श्रीनगर, ८ ऑगस्ट, पहाटे ४ ची वेळ, नीरव शांतता, आम्ही ५ जण पहाटे अडीच वाजताच उठून, थंड-गरम पाण्याने आंघोळ करून आवरून, बॅगाभरून बसलो होतो.
ड्रायव्हर मुदस्सरनी किमान दहा वेळा सांगितल होतं ४ला तयार रहा. हालात बिगडे हुए हैं, हॉटेल के बाहर मत निकलना, सुबह अगर हम निकल सके तो ही जा पाएंगे. हालात बिगडे हुए म्हणजे काय, याचा ट्रेलर आदल्या दिवशीच बघितला होता. अमरनाथ जमीन प्रकरण ऐन भरात होतं. वातावरणांतला तणाव स्पष्ट जाणवत होता, श्रीनगरच्या प्रत्येक गल्लीच्या तोंडाशी, चौक्यांमधे मशिनगन घेऊन २-३ जवान आणि पॅट्रोलिंग साठी आणखी ४-५ जवान एके-४७ घेऊन फ़िरत होते. हे कमी की काय म्हणून CRPF चे जवानही पेट्रोलिंग करत होते. त्यात आता मुदस्सरचा फोन लागत न्हव्ह्ता, 'Out of coverage area' असं सर्वांनी किमान २ वेळा ऐकून झालं होतं. काश्मिरमधून ' out of coverage area' म्हणजे नेमकं कुठे.. हा प्रश्न होताच त्यातच त्याला ४५०० रूपये प्रि-पेड टॅक्सी म्हणून कालच दिलेले होते आणि त्याची रिसिट सुद्धा आमच्याकडे नाही हे लक्षात आलं. अर्थात रिसीट असती तरी काही फ़रक पडणार नव्हताच. मुळच्या प्लॅनमधे नसलेला हा श्रीनगरचा मुक्काम झालाच होता. पूर्ण ट्रिप आवरून पुन्हा मुंबईला जायचं, तरी ते कसं हा प्रश्न होताच. आणि प्रत्येकी सात-आठ हजार रुपये पाण्यात जाणार होतेच.
उगाचच प्रत्येकाला २-३ मिनिटांनी गाडीचा आवाज येतो आहे असं वाटायचं, खिडकीतून बाहेर डोकावल तर डोळे फ़ुटतिल असा मिट्ट काळॊख आणि टाचणी पडली तरी आवाज येईल अशी शांतता असायची. नेमकं काय वाटत होतं, हे सांगायला योग्य शब्द मिळत नाहीत, आजच्या भाषेत म्हणजे "फ़टी पडी थी" असं कहिसं झालं होतं. पण तेवढ्यात कुठुन तरी एक थोडासा उजेड पडला खिडकीवर आणि बघितलं तर मुदस्सर भाई इनोव्हा मधून उतरत होते. जीव भांड्यात पडणे म्हणजे काय ते तेव्हा समजलं.

लडाख: २ वर्षांनंतर

आज ८ ऑगस्ट, २०१०. बरोबर २ वर्षांपूर्वी, ८ ऑगस्ट २००८ रोजी, मी आणि माझे ४ मित्र श्रीनगर ते लेह असा प्रवास करत होतो. अजून त्या आठवणी अगदी जशाच्या तशा ताज्या आहेत. अविस्मरणीय अनुभव आहे तो. पण आज लेह-लडाख बातम्यांमध्ये आहे ते परवा झालेल्या ढगफुटीमुळे. १००हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. लडाखी माणसं या अस्मानी संकटातून लवकरांत लवकर सावरून, पुन्हा एकमेकांना स्मितहास्य करत ’जुले’ म्हणोत एवढीच ईच्छा. अनेक पर्यटकही वेगवेगळ्या ठिकाणी अडकले आहेत. २ वर्षांपूर्वी अशी ढगफुटी झाली असती, तर मीसुद्धा ढगांत गेलो नसतो तर असाच कुठेतरी अडकून पडलो असतो. असो.

तर आता हे जगप्रसिद्ध प्रवासवर्णन इथे प्रसिद्ध करत आहे. काही लोकांनी ते आधी वाचलं आहे. काहींनी "छान-छान" म्हटलं आहे, बहुतेक त्यांनी पूर्ण वाचलं नसावं. एकूण लिखाण जवळ-जवळ दीड वर्षाच्या कालावधीत पूर्ण केलंय. सुरवातीचा उत्साह मधे मावळला मग "MTech project चे दिवस" आले. त्यामुळे थोडं तुटक-तुटक लिखाण झालंय. ज्याप्रमाणे तुकड्या-तुकड्यांमध्ये लिखाण केलंय त्याप्रमाणेच इथे प्रसिद्ध करतोय.
वाचायलाही ते सोईचं पडेल, अर्थात कोणी वाचलं तर.
माझा रूममेट सलिलचे आभार, त्याने ते पूर्ण वाचलं आणि काही लोकांना पाठवलं आणि त्या सर्वांच्या उत्साहवर्धक प्रतिक्रिया मला कळवल्या त्याबद्दल.