Sunday, 25 March, 2012

कहानी में ट्वीस्ट

बर्‍याच दिवसांनी ब्लॉग लिखाण करतोय. ब्लॉग लिहीण्यास कारण की हल्लीच २ चित्रपट बघितले. एक म्हणजे विद्या बालन असलेला हिंदी चित्रपट "कहानी" आणि १९५७ सालचा "12 Angry Men". दोन्ही चित्रपट चांगलेच आहेत. दोन्ही कथांमध्ये कहिही साम्य नाही.
मी अनेक चित्रपट बघितले आहेत. अनेक "Non-Linear" कथा असलेले इंग्रजी आणि स्पॅनिश चित्रपट बघितले आहेत. अनेक थोडेसा खुला शेवट असलेले चित्रपट बघितले आहेत. अशाप्रकारे बरेच चित्रपट बघितल्यामुळे चित्रपटात काय असणार याचा आधीच अंदाज येतो. मग चित्रपटामध्ये अजून कहितरी हवं होतं असं वाटायला लागतं. आता कहानी हा रहस्यमय चित्रपट असल्यामुळे, त्यात काहितरी ट्वीस्ट असणार हे गृहित धरल्यावर, तो ट्वीस्ट काय असणार इतकच कथेत शिल्लक रहातं. मग अर्धा चित्रपट बघितल्यावर ट्वीस्ट काय असणार त्याचाही अंदाज येतो. मग शिल्लक रहातात बारीक-सारीक तपशील आणि थोडेसे संदर्भ. आता कहानी रहस्यपट असल्यामुळे निदान अर्धा चित्रपट बघेपर्यंत तरी कथेकडे लक्ष द्यावं लागतं.
12 Angry Men हा काही रहस्यपट नाही. हा चित्रपट म्हणजे १२ ज्युरींमधली ज्युरीरूम मधील चर्चा आहे. आरोपीला ११ विरुद्ध १ अशाप्रकारे गुन्हेगार ठरवण्यापासून सुरू झालेली चर्चा, एकमताने त्याला निर्दोष ठरवते अशी कथा. ही कथा पहिल्या १० मिनिटांमध्येच समजते. मग रहातो तो तपशील. अर्थात, १२ ज्युरीची पार्श्वभूमी, त्यांच मत आणि मतपरिवर्तन ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. पण कथेच्या दृष्टीने तो तपशीलाचाच भाग आहे. आता हा चित्रपट IMDB वर #6 वर असल्यामुळे,चित्रपट बघताना कथेत कहितरी ट्वीस्ट असेल असं मला वाटत होतं. त्यामुळे जो नायक आहे तोच कदचित गुन्हेगार असेल वगैरे काही तर्कही मी मनातल्या मनात मांडले होते. पण त्यातलं काहिच निघालं नाही त्या्मुळे माझा थोडा भ्रमनिरास झाला. Inception, Edge of the Heaven वगैरे चित्रपट बघितल्यामुळे काहितरी खुला शेवट असेल, असही वाटलं होतं. पण तसही काही झालं नाही.

एकंदरीत सरळ चित्रपट आता मला फारच सरळ वाटायला लागले आहेत आणि रहस्यप्रधान चित्रपटांमध्ये क्लिष्ट गुंतागंतीची कथा आवश्यक झाली आहे.

12 Angry Men च "एक रूका हुआ फ़ैसला" असं हिंदीत रूपांतरही झालं आहे. भारतात ज्युरी पद्धती बंद झाली याचं मला फ़ार दू:ख झालं. ज्युरींमध्ये निवड झाली असती तर न्यायालयाच काम बघायला मिळालं असतं आणि ते पण वर भत्ता घेऊन. त्यानिमित्ताने भारतातील ज्युरी पद्धतीबद्दल शोध घेताना, K. M. Nanavati vs. State of Maharashtra ही रंजक माहिती मिळाली. त्या ऐतिहासिक खटल्यापसून भारतात ज्युरी पद्धती बंद करण्यात आली आणि ज्युरी बनण्याची आपली संधी कायमची गेली.