Monday, 23 May, 2011

पिंक फ़्लॉईड आणि ईनसाईड जॉब

गेल्या आठवड्यात सुहासने मला एक ईमेल पाठवला होता. त्याचा विषय होता "बॅंक नावाची शिवी".  मी पुढे वाचलं तर ते त्याच्या हेरंब ओक नावाच्या कोणा मित्राने लिहिलेल्या ब्लॉगचं नाव होतं. २००८ च्या आर्थिक मंदीविषयी ईनसाईड जॉब नावाचा माहितीपट आहे. त्याविषयी आहे.  मंदीविषयी तशी ढोबळ माहिती आधीच होती. पण सर्व सगभागी लोकांची नावं, त्यांची पार्श्वभूमी, ईतिहास ही माहिती नविन होती. तर हा घोटाळा मूलत: इन्वेस्टमेंट बँकांच्या अति हव्यासामुळे झाला होता. या सर्व संस्थांचा आणि त्यांच्या गुंतवणूक योजनांचा दर्जा ठरवणा‍र्‍या संस्था याही त्यांना सामिल झाल्या.त्यांनी चांगलं गुणांकन दिल्यामुळे सर्वसामान्यांचा पैसा या योजनांमध्ये गुंतवला गेला. या सर्वांवर नियंत्रण ज्यांनी ठेवायला हवं होतं त्या सरकारी यंत्राणांनी ते न केल्यामुळे हा घोटाळा हाताबाहेर गेला.


पण यावरून सरसकट बॅंक नावाची शिवी असं म्हणणं मला थोडं विचित्र वाटलं. मी काही बॅंकेत काम करत नाही. पण भारतात अनेक जण बॅंकिंग क्षेत्रात काम करतात. बॅंकांना माहिती तंत्रज्ञान सेवा पूरवणार्‍या क्षेत्रात माझे अनेक मित्र-मैत्रिणी काम करतात. मी स्वत: बॅंकेच्या अनेक सेवा वापरतो. २००८चं संकट आलं ते मुख्यत: अमेरिकन अर्थसंस्थांच्या अनिर्बंध हव्यासामुळे. भारतिय बँकांवर याचा थेट परिणाम झाला नव्हता. याच श्रेय भारतिय बॅंका आणि मुख्यत: नियंत्रक म्हणून रिजर्व बॅंक, सेबी यांना द्यायलाच हवं. त्यामुळे ते "बॅंक नावाची शिवी" हे सरसकट शीर्षक वाचून माझ्या डोक्यात एक तिडीक गेली होती.
हे म्हणजे निषाणी डावा अंगठा वाचून कोणी शाळा नावाची शिवी असही म्हणू शकेल. निषाणी डावा अंगठा ही डार्क कॉमेडी आहे. पण मूळ विषय तितकाच किंवा त्याच्याहून जास्त गंभीर आहे.
हा सगळे विचार तो ईमेल वाचून मनात आले होते. नंतर घरी मी तो महितीपट बघितला. चांगला आहे. काही गोष्टी थोड्या खटकल्या. एक म्हणजे, मॅनहॅटन भागातल्या वेश्यागृहात ४०-५०% अर्थसंस्थांतले लोक येणार यात नवल ते काय. सिलिकॉन व्हॅलीमधल्या वेश्यागृहात तितकेच सॉफ़्ट्वेअर तंत्रज्ञ मिळाले असते. तसंच ऍलन ग्रीनस्पॅन या माणसाविषयी नीट कल्पाना आली नाही. त्याला, अमेरिकन सरकारबरोबरच, ब्रिटीश आणि फ़्रेंच सरकारने पण त्याच्या कामिगिरीसाठी पुरस्कार दिले आहेत. असं असताना त्याची या संकटातली नक्की भूमिका काय याच अंदाज आला नाही. पण बाकी महितीपट चांगलाच आहे. मला All the president's men ची आठवण झाली.
या महितीपटा मध्ये अजून एक मुद्दा मांडला आहे. या बलाढ्य आर्थिक संस्थांनी विद्यापीठांवरही आता कब्जा केला आहे. अनेक नामवंत विद्यापीठातिल प्राध्यापक या अनेक कंपन्यांचे सल्लागार म्हणून काम करतात किंवा त्यांच्या कार्यकारी मंडळांवर असतात. त्यांच्याकडून पैसे घेऊन, त्यांना हवे तसे संशोधन करून निष्कर्ष काढतात आणि त्याला प्रसिद्धी देतात.  हा प्रकार माझ्या कधी डोक्यात नव्हता आला. हार्वर्ड, कोलंबिया या Ivy League विद्यापिठांमध्ये हा प्रकार चालत असेल हे एकदम धक्कादायक होतं माझ्यासाठी. म्हणजे हे शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांनाही असच शिकवत असतिल. जे पुढे जाऊन कदाचित त्याच आर्थिक संस्थांमधे काम करतिल किंवा कदचित आता करतही असतिल. कदाचित हेच विद्यार्थी या संकटाचे कारण झाले असतिल.

माझ्या आधीच्या विचारांची संगती लागली. तो विचार अगदीच चूकीचा नव्हता तर. शिक्षणक्षेत्रामधल्या बजबजपुरीमुळे, विद्यार्थ्यांना "चांगलं" शिक्षण नाही आणि "चांगलं" शिक्षण नसल्यामुळे सद्सदविवेकबुद्धीने निर्णय घ्यायची क्षमता नाही. आणि मग असे घोटाळे होतच रहाणार. आणि मग मला एकदम पिंक फ्लॉईडच्या, We don't need no education ची आठवण झाली. रॉजर वॉटर्स ने लिहिलेले भन्नाट शब्द आहेत. अगदीच रहावलं नाही म्हणून खाली दिले आहेत.

We don't need no education.
We don't need no thought control.
No dark sarcasm in the classroom.
Teachers leave those kids alone.
Hey, teachers! Leave those kids alone.
All in all, you're just another brick in the wall