Sunday, 16 January 2011

विकिपीडिया:१० वर्षे ज्ञानाच्या बेरजेची

विकिपीडिया: १० वर्षे
(PNG)  
विकिपीडिया: १० वर्षे
(SVG)

कालच, १५ जानेवारी २०११ रोजी, विकिपीडियाला १० वर्षे पूर्ण झाली. गूगल आणि विकी यापैकी मी काय जास्त वापरतो आणि कशाचा मला जास्त उपयोग होतो हे सांगणं कठीण आहे. कित्येकवेळा मी गूगलवर शोध घेण्याऐवजी थेट विकीवरच शोध घेतो. त्यामुळे अपेक्षित माहिती लवकर हाती लागते आणि काम लवकर पूर्ण होतं.

सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे विकीची सगळी सेवा "पूर्णपणे" मोफत आहे. या पूर्णपणेला आता फार महत्त्व प्राप्त झालं आहे. गूगल शोधही मोफत आहे परंतु त्याबदल्यात गूगल आपल्याला जाहिराती दाखवते. अर्थात या जाहिरातींचा उपद्रव थांबवण्यासाठी ऍड ब्लॉक प्लसचा पर्याय आहे. पण आणखी एक गोष्ट म्हणजे गूगल आपल्या वावराची नोंद ठेवते आणि त्याचा वापर करते. विकिपीडियावर असलं काही नाही. तुम्ही कोण आहात, काय करता याविषयी विकीला काही देणं-घेणं नाही. तुम्हाला हवी ती माहिती बघा, वाचा आणि तिचा मुक्तपणे वापर करा. तुम्हाला काही जास्त माहिती असल्यास ते लिहून ईतरांना उपलब्ध करून द्या. साधा-सोपा विचार पण त्यापासून सुरू  झालेल्या विकीने ईतर विश्वकोषांच्या तोंडाला आता फेस आणलाय. इतकं की मायक्रोसॉफ्टला एन्कार्टा विश्वकोष बंद करावा लागला.

या मुक्ततेचे काही दूष्परिणामही आहेत. परवाच मधुगिरीच्या ट्रेकसाठी शोध घेताना विकीवर मधुगिरीच्या पानावर दिलेली माहिती.
कुठली SLJ मेस आणि कुठलं JS किंवा SJ हॉस्पिटल(की प्रसुतीगृह) आणि त्याचा मधुगिरीच्या भूगोलाशी काय संबध हे एक तो लिहीणाराच जाणे! अर्थात तिथेही Edit बटण आहेच आणि माहितगार माणसाने ते सुधारणं अपेक्षित आहे. 
हा मुक्त ज्ञानकोश अनेक भारतिय भाषांमधेही उपलब्ध आहे.  परंतु इंग्रजी भाषेच्या तुलनेने त्या लेखांची संख्या आणि दर्जा दोन्हीही कमीच आहे. पण त्याची जबाबदारीही त्या त्या भाषिक लोकांचीच आहे. मराठी विकीचा दर्जा उंचावण्याची जबाबदारी त्यामुळे आपलीच आहे. दूर्दैवाने, भारतात शिक्षणाची भाषा ईंग्रजी असल्याने, जे काही थोडं ज्ञान अस्मादीकांना आहे ते मराठी मध्ये व्यवस्थित उतरवणं कठिण होऊन बसलेलं आहे. ईंग्रजीमधून मराठी मध्ये भाषांतर करणं किती कठीण आहे याचा प्रत्यय हा ब्लॉग सुरू केल्यावरच आला आहे. परंतु, ज्या गोष्टी भारतामध्येच विकसित झाल्या आहेत त्यातरी किमान मराठी विकीमध्ये व्यवस्थित नोंदवणं शक्य आहे. उदाहरणार्थ, भारतिय शास्त्रीय संगीत, हिंदूस्थानी किंवा कर्नाटकी हे भारतातच विकसित झाले आहे. त्यातील सर्व संकल्पना मराठी भाषेतच आहेत. किमान अशा विषयांवर तरी मराठी विकीमध्ये व्यवस्थित लेख का असू नयेत? तबला, ताल या विषयांवर लेख आहेत पण मात्रा या विषयावर लेख नाही. भैरवी, मारवा, तोडी ईत्यादी रागांविषयी पाने आहेत पण त्यामध्ये त्यातले स्वरसुद्धा दिलेले नाहीत. वाईट याचं आहे की, महाराष्ट्रात शास्त्रीय संगीत गाणारे, समजणारे अनेक दर्दी लोक आहेत पण तरीही विकीची अवस्था काही फार चांगली नाही.
विकीच्या पहिल्या दशकात विकी इंग्रजी भाषेमध्ये वाढला. अशी अपेक्षा करूया की या दूसर्‍या दशकात तो ईतर भाषांमध्येही वाढेल. 
टीप: वरील विकिपीडिया १० वर्षे ज्ञानाच्या बेरजेची हा लोगो मी तयार केला आहे. तो मूळ ईंग्रजी Sharing sum of all knowledge, वरून बनवला आहे. त्या ईंग्रजी वाक्याच भाषांतर जमलं नाही म्हणून हे १० वर्षे ज्ञानाच्या बेरजेची हे बनवलं. PNG बहुतेक सगळ्या ब्राऊजर मधे व्यवस्थित दिसेल. Scalable Vector Graphics (SVG) हे नविन प्रमाण सध्या विकसित होत आहे आणि त्यात देवनागरी अक्षरे आहेत त्यामुळे तो लोगो कदाचित सगळ्या ब्राउजरमध्ये नीट दिसणार नाही. फायरफॉक्स ३.६ मध्ये तो व्यवस्थित दिसतो.


No comments:

Post a Comment