Sunday, 9 May 2010

नमस्ते जग

ब्लॉग लिहावा अस खूप दिवसांपासून, खरं म्हणजे खूप वर्षांपासून वाटत होतं. पण आज योग जुळून आलाय.
आज मुंबईमधे मराठी ब्लॉगलेखकांचा मेळावा आहे. म्हणजे आजचा मुहूर्त चांगला आहे. म्हणून आजच ब्लॉग सुरू करावा असा विचार केला. माझा एक मित्र सुहास सध्या जोरात ब्लॉग लिखाण करतोय. त्याने हा मेळावा भरवण्यातसुद्धा पुढाकार घेतला आहे. तो आणि काही माझे इतर ब्लॉगलेखक मित्र-मैत्रिणी यांच्यापासून स्फ़ूर्ती घेऊन हा ब्लॉग लिहिण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हा ब्लॉग वाचून डोकेदुखी किंवा इतर काही मानसिक विकार जडल्यास वरील सर्व लोकांना जबाबदार धरावे.

आता या ब्लॉगविषयी काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न (ईंग्रजीमधे FAQs). (हे पान कायम बघत रहा, जसजसे नविन प्रश्न जमा होतील तसे ते इथे प्रश्नोत्तरे स्वरूपात लिहिले जातील):

१. पहिल्याच पोस्ट मधे नेहमी विचारले जाणारे प्रश्न समजले कसे?
उ. काय जमलंय ते जमलंय झालं!

२. ब्लॉगचे नाव Don't Panic असं का?
डग्लस ऍडम्स नावाच्या एका लेखकाच एक ‘The Hitchhiker's Guide to the Galaxy’ नावाचं एक अफ़लातून पुस्तक आहे. हे पुस्तक म्हणजे ‘The Hitchhiker's Guide to the Galaxy’ नावाच्या पुस्तकाची गोष्ट आहे. हे गाईड Ursa Minor वरून प्रकाशित झालयं आणि पृथ्वीवरील कोणी त्याविषयी ऐकलही नसेल. तर त्या गाईडच्या पहिल्या पानावर लिहिलं आहे ‘Don't Panic’.

३. ब्लॉगचा पत्ता anishology.blogspot.com असा का?
उ. यात दोन उप-प्रश्न अंतर्भूत आहेत. त्या दोन्हींची उत्तरे खाली दिली आहेत.
अ - अजून देवनागरीमधे महाजालावरचे पत्ते देता येत नाहीत. त्यामुळे रोमन लिपीमधेच लिहावं लागलं.
आ - अनिश म्हणजे मी, आणि माझे शास्त्र म्हणून anishology. हे नाव तुम्हाला न आवडल्यास दुसरं नाव सुचवू शकता.

४. ब्लॉग कशाविषयी असेल?
उ. सध्यातरी सॉफ़्टवेअर आणि मी पाहिलेले चित्रपट यांच्यावर लिहायचा विचार आहे. मी ‘movie buff' नाहीये पण हळूहळू करत चित्रपटांचा चांगला संग्रह जमा झालाय. काही दूर्मिळ किंवा परदेशी भाषांचे चित्रपटसुद्धा आहेत. पण शेवटी हा माझा ब्लॉग आहे. त्यामुळे मला वाटेल त्याविषयी मी लिहीन. राजकारण, समाजकारण, प्रवासवर्णन अगदी काहीही.

५. किती नियमितपणे ब्लॉग लिहिणार?
उ. पुन्हा एकदा, हा माझा ब्लॉग आहे. मला वाटलं तर लिहीन नाही तर नाही लिहिणार. मी लिहील्यामुळे किंवा न लिहिल्यामुळे समस्त मानवजातीचं काहिही नुकसान होणार नाही. तुम्ही प्रतिक्रिया दिल्यात तर आनंद आहे. पण नाही दिल्यात तर दू:ख नाही. मुख्य उद्देश या पानावर जाहिराती दाखवून जमल्यास थोडी वरकमाई करणे हा आहे. ;-)

६. या ब्लॉगचा अपेक्षित वाचकवर्ग कोण आहे?
उ. जो/जी वाचेल तो/ती, पण निरक्षर असेल तर उत्तम.

७. या लेखाचं नाव ‘नमस्ते जग’ असं का?
उ. मी सॉफ़्टवेअर तंत्रज्ञ आहे. आतापर्यंत प्रत्येक नविन संगणकीय भाषा शिकतानाHello Worldपासून सुरुवात करत आलो आहे. त्यामुळे नियमिततेसाठी ब्लॉगची सुरुवात सुद्धा ‘Hello World’ पासून केली आहे. फ़क्त मराठी मधे आहे म्हणूननमस्ते जगअशी केली आहे.

2 comments:

  1. अनिश,
    सर्वप्रथम ब्लोग सुरू केल्याबद्दल तुझे अभिनंदन आणि अनिशोलोजी च्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्या खूप शुभेच्छा!!
    दुसरी गोष्ट म्हणजे ब्लोगच नाव जरी "Don't Panic " अस असलं तरी मी बेधडक एंट्री मारणार आहे तुझ्या लिखाणाच्या Galaxy मधे.
    ब्लोगचं नाव कसं ठेवलस यावरूनच कळतयं की त्याचा विशिष्ठ प्रांत नाही. तू "स्वांत सुखाय" लिहिणार....
    बाकी तुझे FAQs अगदी मस्त आहेत...

    ReplyDelete
  2. @थेट दिल से:
    धन्यवाद. आपण केव्हाही बेधडक एंट्री मारा, आम्हांस आनंदच आहे.

    ReplyDelete