वास्तुपुरुष, सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर दिग्दर्शक जोडीचा एक उत्तम चित्रपट. त्यांचे दहावी फ, देवराई वगैरे इतर चित्रपटसुद्धा उत्कृष्ट आहेत. पण तरीही चित्रपटाविषयी लिहाव असं म्हटल्यावर मला वास्तुपुरुषच पहिल्यांदा आठवला. वास्तुपुरुष मी पहिल्यांदा बघितला होता केबलवर. तेव्हा सुरुवातीचा भाग चुकला होता पण तरीही मला तो चित्रपट खूप आवडला होता. नंतर मला त्याची सीडी मिळाली आणि मी पूर्ण चित्रपट बघितला तेव्हा तो मला अजून जास्त आवडला. नंतर मी हॉस्टेलच्या खोलीत, तो कुठूनतरी मधूनच सुरु करायचो आणि बघायचो तरीही मला तो भावायचा. खरं सांगायचं तर त्यातल्या कुठल्याही पात्राशी मी स्वतःला जोडू शकत नाही. चित्रपटातल्या कुठल्याही व्यक्तीच्या कथेचा आणि माझ्या आतापर्यंतच्या जीवनाचा काहीही संबध लावता येत नाही. तरीही तो चित्रपट माझ्यापर्यंत पोचतो, मला भावतो आणि तेच बहुतेक चित्रपटाच यश आहे.
खरंतर चित्रपटाला काही मोठी कथा नाहीये. एका प्रसिद्ध, मॅगॅसेसे पुरस्कार प्राप्त डॉक्टरच्या जीवनाचा फ्लॅश-बॅक मधे मांडलेला घटनाक्रम आहे. चित्रपटामधे कुठेही रहस्य, विनोद, कथेची गुंतागुंत, थरार असलं काहिही नाहिये. हेच बहुतेक माझ्यासारख्या सर्वसामान्या माणसाच्या जीवनात आणि चित्रपटामध्ये साम्य आहे. चित्रपटाचा नायक भास्कर देशपांडे याची घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, पण म्हणून त्याला काही दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नाहिये की शाळेची फी न भरल्यामुळे त्याला शाळेतून काढून टाकायची वेळ आली नाही आहे. तो शाळेत प्रथम क्रमांक पटकावत उत्तीर्ण होतोय. फक्त त्याला शिष्यवृत्ती मिळाली नाही तर वैद्यकीय शिक्षणाचा खर्च परवडणार नाही इतकाच प्रश्न आहे. भास्करची हिकमती आई कशीतरी त्याची सुरुवातीची सोय लावून देते, कथा म्हणायची तर एवढीच. पण याच्या जोडीला अनेक पात्रं, संवाद आणि प्रसंग आहेत जे एक चित्रपटाला परिणामकारक बनवतात. चित्रपटामधील प्रत्येक व्यक्तिरेखा अगदी अस्सल आहे. सर्वांचाच अभिनय उत्कृष्ट आहे. अतुल कुलकर्णी एक दर्जेदार अभिनेता आहे. पण या चित्रपटामधे मला तरी त्याचाच अभिनय सर्वात कमी प्रतिचा वाटला. त्यातील गोटूराम म्हणजे घरचा नोकर, तो सुद्धा अगदी त्याच्या प्रत्येक संवादासहित लक्षात रहातो.
चित्रपटाची सुरुवात धीर-गंभीर आवाजात म्हटलेल्या वास्तु-वास्तुपुरुष यासंबधीच्या संस्कृत श्लोकाने होते आणि एक माहौल बनून जातो. एक दू:खाचा, कारूण्याचा एक टोन कायम रहातो. चित्रपटामध्ये गाणी अशी दोनच आहेत. दोन्हीही गाणी एकदम गावरान स्वरूपाची आहेत. ‘रात्रीच्या पोटामंदी अंधाराच्या व्हटामंदी वाजतोया हरीचा पावा’ आणि ‘कान्ह्या असाकसा जाशी लांब दूर देशी’ दोन्हीही गाणी एकदम जमलेली आहेत. त्यातला नाच, बहुतेक नंदू माधवने केलेला, एकदम जोशपूर्ण आहे. काही प्रसंगांमध्ये उ. सैदूद्दीन डागर, (बहुतेक डागर बंधूंपैकी एक) यांच्या ध्रुपद चा वापर पार्श्वसंगितासाठी केलेला आहे. तो सुद्धा भारून टाकतो.
चित्रपट फ़्लॅशबॅकने उलगडत असताना काही प्रसंगांमधे मोठा भास्कर(महेश एलकुंचवार) त्याला आता मागे वळून बघताना काय वाटतय ते सांगतो, ते सर्व प्रसंग अगदी भिडतात.
चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी उत्कृष्ट आहे. सुमित्रा भावेंचे संवाद एकदम साजेसे आहेत.
हे लिहिताना आठवलेली गोष्ट, चित्रपटातीला आणखी एक समान गोष्ट म्हणजे माझ्या वडीलांना डॉक्टर व्हायची ईच्छा होती पण मुंबईला राहून वैद्याकिय शिक्षणाचा खर्च परवडणारा नाही म्हणून त्यांना सावंतवाडीला B.Sc. करावं लागलं होतं. कदाचित त्यामुळेच, मी किंवा दादाने डॉक्टर व्हावं अशी घरातिल सर्वांची ईच्छा होती पण आम्ही दोघेही डॉक्टर झालो नाही.
असो. एकूण काय वास्तुपुरुष जरूर बघावा.
No comments:
Post a Comment