Saturday 5 June, 2010

The Motorcycle Diaries (Diarios de Motocicleta)

The Motorcycle Diaries मूळ स्पॅनिश नाव (Diarios de Motocicleta) हा आणखी एक उत्तम चित्रपट. बॉसच्या तोंडून लॅबमधे कधीतरी हे नाव ऐकलं होतं. तेव्हा मी त्याचा ’Zen and The Art of Motorcycle Maintenance’शी काहितरी संबंध जोडून टाकला होता. तेव्हा मला दोन्हीविषयी काहिही महिती नव्हती.
मी आमच्या "जगप्रसिद्ध आणि ऐतिहासिक" लडाख दौर्‍यानंतर आलेल्या हॅंगओव्हर मधे कधितरी हॉस्टेलच्या खोलीत हा चित्रपट बघितला होता. त्यामुळे त्यातील प्रत्येक गोष्ट मला आमच्या लडाख दौर्‍यासारखीच वाटत होती. त्यामुळे कदाचित हा चित्रपट मला खूप आवडला असावा.
मी चित्रपट बघितला तेव्हा मला चे गेव्हाराविषायी काहिही माहित नव्हतं. ते त्याचं टी-शर्टवरचं प्रसिद्ध चित्रही मी कधी बघितलं नव्ह्तं. त्यामुळे कसलाही पूर्वग्रह नव्हता. त्यामुळे चित्रपट एकदम नविन आणि ताजा वाटला होता. पुढे मी तो बरेच वेळा बघितला. वास्तुपुरूषसारखाच हाही चित्रपट मी कुठूनही सुरू करून बघायचो.
अर्नेस्टो गेव्हारा दे ला सेर्ना (Ernesto Guevara De La Serna) आणि अल्बर्टो ग्रॅनादो (Alberto Granado), वय अनुक्रमे २३ आणि २९ वर्षे, यांनी दक्षिण अमेरिकेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मोटरसायकल वरून केलेल्या सफ़रीची ही अद्भूत गोष्ट.
चित्रपटाची सुरुवातच,"This is not the tale of impressive deeds. Is a piece of two lives taken in a moment when they were cruising together along a given path with same identity of aspirations and dreams." या फ्रेमने होते. त्यातील साधा सरळ प्रामाणिकपणा भावतो. ४ महिन्यात ८००० किमीची सफ़र पूर्ण करण्याची मूळ योजना आणि ती पूर्ण करण्याचा मार्ग "improvisation". हे improvisation एकदम अफ़लातून आहे. त्याची सुरूवातच रस्ता ठरवताना दिसते. अल्बर्टो स्केचपेनने नकाशावर काहितरी एक रेषा काढतो आणि हा रस्ता धरायचा असं ठरवतो. त्यांची ती ’La Poderosa' (The mighty one) मोटरसायकल आणि त्यावर लादलेलं सामान त्यांचे ते कपडे सगळयातच एक बेफिकीरी दिसते. ते बघून फार मजा वाटते. La Poderosa च्या रूपाने मला चालणारी नॉर्टन मोटरसायकल बघायला मिळाली.
त्या दोघांच्या प्रवासाचं चित्रण तर अफ़लातून आहे. एक तर मूळात तो प्रदेश फ़ार सुंदर आहे. अर्जेंटिनामधला गवताळ प्रदेश (पंपा प्रदेश), अँडिज पर्वतरांगा प्रेक्षणिय आहे. चित्रपटामधे सिनेमॅटोग्राफीमुळे ते अजून सुंदर दिसतं आणि अर्नेस्टो आणि अल्बर्टो यांचे संवाद आणि अभिनय त्यातलं नाट्य त्या सौंदर्यामध्ये अजून भर टाकतं. चित्रपटामधे एक विलक्षण दृश्य आहे. १०-१५ सेकंदांचं असेल, कॅमेरा पूर्ण स्थिर आहे. फ़्रेममध्ये फ़क्त गवताळ प्रदेश आहे. त्यातच मधून एक रस्ता आहे जो दिसत नाही फ़क्त मोटरसायकल गेल्यामुळे उडालेल्या धुळीच्या लोटामुळे जाणवतो. आपण फ़क्त अवाक होऊन बघत रहातो.

अर्नेस्टोची प्रेयसी, चिचिना, सुंदर आहे तिला बघताना, याला तिला सोडून प्रवासाला निघण्याची अवदसा का आठवली असाच प्रश्न पडेल!
प्रवासातील अनेक लहान-मोठे अपघात, पार्टीमधील स्पॅनिश गाणे, ती गाणारी स्त्री, दुसर्‍या एका स्त्री बरोबर नाचतानाचा प्रसंग मजेशीर आहेत. त्याचबरोबर चिलीमधील आदिवासींचे दारिद्र्य, पैसे नसल्यामुळे औषध-पाण्याशिवाय जगणारी आजीबाई, अटाकामामधल्या खाणींमधील मजूरांची परिस्थिती, पेरूमधील मूलनिवासींची हलाखीची स्थिती, संपन्न इंका साम्राज्याची स्पॅनिश आक्रमकांनी केलेली धूळधाण मन विषण्ण करते. इंकांच्या राजवटीतल्या ईमारतींचेच चर्चमधे केलेले रूपांतर आणि चर्चमधील प्रार्थनेला न आल्यामुळे महारोग्यांना ख्रिस्ती मिशनर्‍यांनी दिलेली सापत्न वागणूक अस्वस्थ करते. ईथे "Before he changed the world the world changed him." ही सिनेमाची टॅगलाईन एकदम चपखल आहे हे जाणवतं.
चित्रपटातील मुख्य अभिनेते म्हणजे, गाएल गार्सिया बर्नाल (Gael García Bernal) (अर्नेस्टो ’चे’ गेव्हारा) आणि रॉड्रिगो दे ला सेर्ना (Rodrigo De la Serna) (अल्बर्टो ग्रॅनादो) यांचा अभिनय उत्तम आहे. गाएल गार्सिया बर्नाल हा स्पॅनिश चित्रपटांमधला टॉम हॅंक्स आहे. त्याच्या ईतर चित्रपटांविषयी पुन्हा केव्हातरी. दिग्दर्शक वॉल्टर सालेस (Walter Salles) आणि होसे रिवेरा (Jose Rivera) यांनी चित्रपट मूळ पुस्तकापेक्षा चांगला बनवलाय.
मोटरसायकल डायरीचं संगीत ही त्याची आणखी एक जमेची बाजू आहे. गुस्तावो सन्ताओलाज्यानी (Gustao Sabtaolalla) तयार केलेला OST जबरदस्त आहे. तो चित्रपटाच्या एकूण मांडणीत एकदम मिसळून जातो पण त्याचा परिणाम जाणवत रहातो.

2 comments:

  1. मस्त आता बघुया कधी बघायचा योग येतोय ते... :)
    अनिश. ब्लॉग विश्वात स्वागत.लवकरात लवकर लडाखनामा येऊ देत आणि हो ब्लॉगला फीडबरनरचा विजेट लाव ना म्हणजे पोस्ट इनबॉक्स येऊ शकतील डाइरेक्ट तू पोस्ट केल्या केल्या.

    खूप शुभेच्छा..लिहते रहा

    ReplyDelete
  2. @सुहास: धन्यवाद. लडाखनामा टाकतो कधितरी. बघतो हळूहळू विजेट वगैरे काय ते. ब्लॉगचे फंडे कच्चे आहेत माझे. तूच मार्ग दाखव. ;-)

    ReplyDelete