Monday, 7 June 2010

The Edge of Heaven (Auf der anderen Seite)

फतिह अकिन या जर्मन-तुर्की दिग्दर्शकाचा हा जर्मन-तुर्की चित्रपट. जर्मनी मधे अधिकृत आणि अनधिकृत मिळून बरेच तुर्की लोकं रहातात. तुर्की समुदाय हा जर्मनीमधे सगळ्यात मोठा अल्पसंख्य समुदाय आहे. त्यांची संख्या इतकी आहे की मागे जर्मनीच्या चॅन्सेलर ऍंजेला मर्केलनी तुर्की लोकांनी जर्मनीत रहाताना जर्मन संस्कृती आणि भाषेचा सन्मान करायला हवा असं म्हटल्याचं आठवतं.
Auf der anderen Seite चा शब्दश: अर्थ ’दूसर्‍या बाजूला’(On the Other Side) असा होतो पण इंग्लंड-अमेरीकेमध्ये त्याचं प्रदर्शन The Edge of Heaven या नावाने झालं होतं. तेरेंतिनोच्या पेटंट असलेल्या धाटणीने, वेगवेगळी कथासुत्रे एकत्र बांधून चित्रपट बनतो. Yeter's Death, Lotta's Death आणि The Edge of Heaven अशी तीन कथासुत्रं आहेत. ही कथा एक बाप-मुलगा यांची जोडी आणि दोन आई-मुली यांच्या जोड्या यांची.
Yeter's Death:
जर्मनीमध्ये रहाणारा तुर्की वंशाचा, शहरी गुळगुळीतपणा नसणारा बाप म्हणजे अली अक्सू, त्याचा जर्मन भाषेचा प्राध्यापक असलेला मुलगा, नेजात अक्सू आणि तुर्की असलेली पण जर्मनीमधे वेश्या व्यवसाय करणारी येतेर यांची गोष्ट Yeter's Death मधे येते.
Lotta's Death:
येतरची मुलगी, अयेतन ही डाव्या विचारांच्या क्रांतीकारी संघटनेची कार्यकर्ती आहे. ती पोलिस पकडतिल या भीतीने, बनावट पासपोर्टवर गुल नावाने आईच्या शोधात जार्मनीमधे येते. तिथे शार्लोट उर्फ़ लोटा या जर्मन मुलीची आणि अयतनची मैत्री होते. पुढे शार्लोटचा मृत्यू होतो आणि सुझान म्हणजे शार्लोटची आई, शार्लोटची ईच्छा पूर्ण करायचं ठरवते.
The Edge of Heaven
सुझान शार्लोटची ईछा पूरी करते का, अलीचं पुढे काय होतं, नेजातला अयतन भेटते का, नेजात अलीला माफ़ करतो का वगैरे अनेक गोष्टी या भागात येतात.

कथा तीन वेगवेगळ्या भागात असली तरी, खूप काही नॉन-लिनिअर नाही. अनेक प्रश्न पडतात, काहींची उत्तरे मिळतात, काही मुद्दामच अपूर्ण सोडलेल्या आहेत. कथेचे काही भाग अपूर्ण सोडलेले असले तरी कथा खूप काही अमूर्त (abstract) किंवा अनाकलनीय नाही.
कथेचा पहिला भाग झाल्यावर, कथा "नेहमीचचं" अनपेक्षित वळण घेणार असं वाटतं पण पुढे कथा ख्ररंच अनपेक्षित वळण घेते. शेवट पुन्हा अपेक्षित होणार असं वाटत असतानाच पुन्हा आकस्मिकपणे चित्रपटाचा वेगळा शेवट होतो.
चित्रपटामधे ६ मुख्य कलाकार आहेत आणि सगळ्यांचीच कामे छान आहेत तरिही सगळ्यात लक्षात रहाणारं काम आहे ते अयतन साकारणार्‍या नुरगुल येसिलिकायचं.
एकूणात काय तर एकदा बघायला हरकत नाही.

No comments:

Post a Comment