शेवटी हो-नाही करता करता, प्रत्येकाने आप-आपल्या आई-वडिलांची समजूत काढून निघायचं नक्की केलं. अमरनाथ प्रकरणामुळे तेही एक मोठं काम झालं होतं. त्यातच नकटीच्या लग्नाला सतरा विघ्ने त्याप्रमाणे ८ ऑगस्टला दीक्षांत सोहळा होता त्यात राष्ट्रपती प्रतिभा पाटिल येणार म्हणून सुरक्षा व्यवस्था चौपट केलेली. त्यामुळे पहाटे रिक्षा आत सोडणार नाही हे समजलं, त्यामुळे मग समिर आणि प्रमित हॉस्टेलपासून चालत मेन गेट ला जाऊन रिक्षा घेऊन आले. त्यात सामान टाकले आणि आमच्या ट्रिपची सुरुवात झाली.
--विमान मुंबईहून वेळेवर सुटले पण दिल्ली ला काय झाले कुणास ठावूक, एक तास धावपट्टीवरच थांबले.त्यामुळे श्रीनगरला पोचायला एक तास उशीर झाला. बाहेर येऊन JK Tourism च्या काऊंटरवर चौकशी केली, तेव्हा कळलं की कारगिलची बस आता गेली आणि दुसर्या दिवशी सकाळी पुढची बस मिळेल. पण प्रिपेड टॅक्सी मिळेल असं समजलं. मग इकडे-तिकडे चौकशी करून घासाघीस करून चार हजार रूपयांत कारगिल पर्यंत जायला एक इनोव्हा मिळाली. सामान भरलं गाडीत आणि मनातल्या मनात गणपती बाप्पा मोरया म्हटलं.
खरं म्हणजे पहाटे ३ला ऊठून आता साडे अकरा पर्यंत पोटात काही न गेल्यामुळे मरणाची भूक लागली होती. पण आमच्या चालकाने अम्हाला, "हालात अच्छे नही है, आज जुम्मॆ का दिन है, २ बजे नमाज का वक्त होता है, कुछ दंगा-फ़साद हो सकता है, हमे पहले गंधरबाल डिस्ट्रीक्ट पार करना चाहिये, उसके बादही हम रूक सकते है" असं सांगितल्यावर कसली तहान आणि कसली भूक असं झालं.
गाडीतून जाताना दाल सरोवर आणि त्याच्या मधोमध असलेली चार चिनारचे वृक्ष बघायला मिळाले. खरं तर तिथे थोडावेळ थांबायची ईच्छा प्रत्येकालाच होत होती पण व्यक्त करायची हिंमत होत नव्हती. गाडी श्रीनगरपासून ४-५ किमी आली आणी गंधरबाल जिल्ह्याची हद्द सुरु झाली. तिथल्या पोलिसाने गाडी अडवली आणि सांगितले की आणखी ४-५ गाड्या एकत्र करा, स्थानिक पोलिसांकडून escort van घ्या तरच सोडेन. हा सगळा प्रकारच अम्हाला नवीन होता. मग तास-दोन तास पोलिस ठाणे आणि ती जिल्ह्याच्या हद्दीवरचं चेकपोस्ट यामधे २-३ चकरा मारून काही मांडवली करायचा प्रयत्न झाला. पण तो अयशस्वी झाला. ड्रायव्हर आणि ईतर लोकांच्या काश्मिरी भाषेतिल चर्चेतून आम्हाला एवढंच समजलं की तो पोलिस-प्रमुख काश्मिरी मुसलमान नाही कोणीतरी नविन बदली होऊन आला आहे.
एक नक्की झाल की त्या दिवशी काही आम्ही कारगिल ला पोचणार नाही. आमच्या प्लॅन 7B चे पहिल्यादिवशीच तीन तेरा झाले होते. ड्रायव्हरशी प्लॅनची चर्चा केल्यावर त्याने अम्हाला पहाटे ४ वाजता निघून रात्रीपर्यंत लेह पर्यंत पोचवायची तयारी दाखवली. मग त्याच्याकडे असलेल्या सुमो आणि इनोव्हा, त्यांचे वेगवेगळे दर, लेह पर्यंतचे अंतर आणि आमचं कोलमडलेले बजेट यासगळ्यावर चर्चा करून घासाघीस करून शेवटी त्यच्याशीच सौदा ठरला. मग त्यानेच दाखवलेल्या एका हॉटेलमधे मुक्काम केला. जवळच्याच एका रेस्टॉरंट मध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर असं एकत्रित काहितरी खाऊन हॉटेलमधे परतलो.
No comments:
Post a Comment