लहरी हवामानामुळे रस्त्यांची काही शाश्वती नाही, दूर-दूर पर्यंत कुठे काही खायला-प्यायला मिळेल याची काही खात्री नाही. त्यामुळे लडाख मधे कुठेही जायचे झालं तर सकाळी लवकर निघणं केव्हाही चांगलं. त्याप्रमाणे लवकर उठून टोमॅटो आम्लेट, चहा घेऊन निघालो. आमच्या एक्स्पर्ट ड्रायवर अंकलनी लेह मधून बाहेर पडून खार्दूंग ला च्या रस्त्याला लागणारा कुठलासा शॉर्टकट मारला होता. त्या रस्त्यासदृश भूभागावरून थोड्यावेळांत आम्ही मुख्य रस्त्याला लागलो. रस्ता टेकड्यांवरून हळूहळू वर वर चालला होता.
जसजशी उंची वाढायला लागली तसतसे दूरचे बर्फाच्छादीत डोंगर जास्त स्पष्ट दिसायला लागले. सकाळची वेळ होती त्यामुळे सूर्याचा नारींगी प्रकाश त्या डोंगरांवर पडून परावर्तित होत होता. त्यामुळे ते सोनेरी चकाकणारे डोंगर छानच दिसत होते. एका ठिकाणी, "क्या सही दिख रहा है" असं म्हणून थांबून फोटो सेशन झाल्यावर, पुढच्याच वळणावर अजून छान दृश्य दिसत होतं, पुन्हा थांबून फोटो सेशन अस दोन-तीन वेळा झाल्यावर, सगळ्यांची हौस भागली. आणि मग आम्ही एकदम खार्दूंग ला च्या दक्षिण बिंदूवर येऊन पोचलो. खार्दूंग, ला म्हणजे खिंड (pass), ही लष्करी दृष्ट्या फ़ार महत्त्वाची आहे. सियाचेन ला जाणारा रस्ता हा खार्दूंग ला मधून जातो. त्यामुळे त्यावर लष्कराचे पूर्ण नियंत्रण आहे. खिंडीच्या उत्तर आणि दक्षिण बाजूला लष्कराची चेक-पोस्ट आहेत. तिथून परवानगी दिली तरच खार्दूंग ला मधून जाता येतं. ही परवानगी हवामान, लष्कराची वाहतुक या दोन्ही गोष्टींवर अवलंबून आहे. तिथे एक चहापान सत्र झालं तोपर्यंत ड्रायवर अंकलनी तिथल्या चौकीत एन्ट्री करून आले. मग खार्दूंग ला मधला प्रवास सुरू झाला. एकूणच लडाख मधले सगळेच रस्ते हे घाटरस्ते असल्यामुळे या रस्त्याच काही विशेष असं काही वाटत नव्हतं. पण अधून-मधून दिसणारा बर्फ़ आता सर्वत्र दिसत होता. मग आम्ही खार्दूंग ला च्या सर्वात उंच टोकावर पोचलो. तिथला तो "Highest Motorable Road in The World" चा फ़लक सगळ्यांनी आधी टिव्हीवर बघितला होता. त्यामुळे गेल्या-गेल्या तिथे जाऊन त्याच दर्शन घेतलं आणि त्याच्याबरोबर फोटो काढून आम्ही कृतकृत्य झालो.
|
पुरावा |
आता आमच्याकडे लडाखला जाऊन आल्याचा पुरावा होता आणि तोसुद्धा फोटोशॉपशिवाय! तेवढ्यात आम्हाला समजलं की तिथल्या एका चौकीमधे चहा मिळतोय त्यामुळे सगळे तिथे वळले. आमचा आनंद द्विगुणित झाला जेव्हा आम्हाला समजलं की तो फुकट आहे. पण तो चहासद्रुष्य द्रवपदार्थ बघून आमचा आनंद पुन्हा अर्धा-गुणित झाला. पण गारठलेल्या हातांमधे कही गरम वस्तू पकड्ण्याचा आनंद होताच. तो संपवल्यावर बाहेर पडून बर्फामधे खेळण्याचा कार्यक्रम झाला. त्यात दमछाक झाल्यावर गाडीमधे बसून पुढचा प्रवास सुरू झाला. जरा पुढे गेल्यावर समजलं की पुढे बर्फामुळे रस्ता बंद झाला आहे पण तो मोकळा करण्याच काम चालू आहे. त्या चहामुळे आणि खेळण्यामळे भूक चाळवली होतीच त्यात आता नुसतं बसण्यामुळे काहीतरी तोंडात टाकायला हवं होतं. आम्ही मागच्या २ दिवसांच्या अनुभवामुळे यावेळेला ब्रेड-बटर बरोबर आणलं होतं. ते खाऊन झालं. तो पर्यंत रस्ता मोकळा झाला आणी गाडी निघाली. नंतर सरळ आम्ही उत्तर बिंदूवरून बाहेर पडलो म्हणजे आता अम्ही खार्दूंग ला ओलांडून नुब्रा खोर्यात प्रवेश केला होता.
No comments:
Post a Comment