सकाळी ५च्याही आधी, श्रीनगरमधून निघालो. आता दाल सरोवराच्या दुसर्या बाजूने, हजरतबल दर्ग्यावरून निघालो. भल्यापहाटे नीरव शांतता थंड हवा. जरा उजाडले तसे आम्हाला समजले की आम्ही तो संवेदनशील गंधारबाल जिल्हा पार केला आहे. आता काही प्रॉब्लेम नाही. मग आम्ही सगळेच तणावमुक्त झालो. काश्मिरच्या सौंदर्याचा खर्या अर्थाने आस्वाद घेऊ लागलो, मनाला येईल तसे कॅमेरे क्लिक व्हायला लागले.
जवळजवळ दोन तासांचा प्रवास झाला होता, सगळ्यांनाच चहाची हुक्की आली होती. ड्रायव्हर मुदस्सर, ज्याचा आता 'टीचर अंकल' झाला होता. कालपासून त्याने एवढ्या सूचना दिल्या होत्या की आता फ़क्त दोन-दोनच्या जोडीने चला हेच सांगायचं बाकी राहिलं होतं. टीचर अंकलनी आपण सोनमर्गला थांबू असं जाहिर केलं. पुढे १५-२० मिनिटांत सोनमर्ग आलं मग तिथे गरम-गरम चहाचा कप हातात घेऊनच एक छोटी चक्कर मारून आलो. तेवढ्यात टीचर अंकलनी, "चलो" अस फ़र्मान काढलं. हेही खरं होतं की लेह पर्यंत जायच होत म्हणजे थोडी घाई करायला लागणारच होती.
सोनमर्ग सोडलं आणि महामार्गावरील लष्करी तळांची संख्या वाढायला लागली. एवढा वेळ दूर दिसणारे हिमालयाचे पहाड जबळ यायला लागले. हे पहाड ओलांडले की आम्ही काश्मिर खोर्यातून लडाख मधे शिरणार होतो. आणि त्यांना जोडणारा रस्ता म्हणजे इतिहास प्रसिद्ध 'झोजी ला'. झोजी ला त्याच्या सर्वोच्च ठिकाणी १४२०० फ़ूटावर जातो. विरळ झालेली हवा आणि थंडी लगेचच जाणवू लागते.
झोजी ला सोडले आणि आम्ही द्रास खोर्यात उतरलो. द्रास हा कारगिल जिल्ह्याचा भाग आहे. झोजी ला ओलांडली आणि जमिन, डोंगर आणि झाडांमधला फ़रक लगेच जाणवू लागतो. उघडे-बोडके डोंगर, खडकाळ जमिन आणि खुरटी झाडे. रस्ता द्रास आणि पुढे कारगिल पर्यंत सुरवातीला चिनाबच्या आणि नंतर द्रास नदीच्या काठा-काठाने जात रहातो. इथे खुरट्या गवतावर शेळ्या-मेनद्या चरत होत्या. त्यातल्या एका शेळीची शिंगं बघून प्रमितने sing is king , sing is king हे गाणं गायला सुरुवात केली आणि ते गाणं पूर्ण ट्रिपच घोषवाक्य बनून गेल.
लडाखमधील सगळेच रस्ते Border Road Organization (BRO) नी बांधले आहेत आणि देखभालीची जबाबदारीही त्यांच्याकडेच आहे. त्यांनी लावलेल्या पाट्यांवरील विनोदी वाक्यं वाचत वाचत, लष्कराच्या कॅरावान मधून वाट काढत काढत आम्ही कारगिल ला पोचलो. कारगिल हे जिल्ह्याच ठिकाण आहे. सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेजे, छोटी हॉटेले असं गजबजलेले ठिकाण आहे. नाहीतरी जेवायची वेळ झालीच आहे तर आता इथे एक तासभर काढून जेवून निघायचे अस ठरवून आमची पंचकडी कारगिल दर्शनाला निघाली.
लडाखसाठी गुगल करताना मिळालेले "Kargil - Vegetarian's Hell" हा ब्लॉग सगळ्याना आठवला. कारगिलमधे शुद्ध शाकाहारी हॉटेल तर सोडूनच द्या पण शाकाहारी जेवण जिथे मिळेल अशी हॉटेलेही नाहित. एकमेव शीख सरदारजी एक खाणावळ चालवतो, तिथे भात, राजम्याची उसळ आणि लोणचं असं जेवण मिळाले. आणि त्या ब्लॉगमधे नसलेली एक गोष्ट समजली ती म्हणजे ती भुक्कड भात-राजम्याची थाळी आम्हाला ५० रूपयांना पडली होती. दुसरा काही पर्याय नव्हता, मुकाट्याने २५० रुपये देऊन आम्ही बाहेर पडलो.
टीचर अंकलही जेवून आले होते, गाडीतही डिझेल भरलं आणि पुढे प्रवास सुरू झाला.
कारगिल ते लमायुरू हा प्रवास म्हणजे लडाखचं पहिलं अस्सल दर्शन. क्षितीजापर्यंत पसरलेल्या डोंगररांगा, त्यातून जाणारा रस्ता. रस्त्यावर किंवा डोंगरांवर चुकून एक हिरवं पान नाही. मैलोनमैल एक माणूस नाही की एक गाडी नाही. मधेच एखाद ३-४ घरे असलेले एखादं गाव. सजीव सृष्टीच जे काही दर्शन होईल ते त्या गावांतच. झाडं माणसाच्या आधारावर जगत असल्याच हे पृथ्वीतलावरच एकमेव उदाहरण असावं.
कारगिल पासून ३-४ तासच्या प्रवासानंतर लमायुरू आले. लमायुरूला बौद्ध मॉनेस्ट्री आहे. मी आणि समीरने याआधी सिक्कीममध्ये बौद्ध मॉनेस्ट्री बघितल्या होत्या. त्यावरून आमच्यापैकी कोणालाही त्यात फ़ार काही बघण्यासारखं नसतं असं मत झालं. आणि लेहजवळ असलेली हर्मिसची मॉनेस्ट्री आम्ही बघणार होतो़च, त्यामुळे इथे थांबावे की नाही अशी चर्चा करत असतानाच, टीचर अंकलनी इथे काही बघण्यासारखं नाही असं म्हणून गाडी सुरुही केली. टीचर अंकलना आता लेहला जायची घाई झाली होती. पण किमान चहासाठी तरी थांबूया यावर मात्र ते तयार झाले. मग जवळ्च्या टपरीवर चहाची ऑर्डर दिली. जरा बाजूला बघितलं तर पिवळ्या-नारिंगी फळांनी डवरलेले एक झाड दिसलं. बघतो तर काय, ती फळ म्हणजे जर्दाळू होते. मुंबईत २०० रू. किलोने मिळणारे जर्दाळू म्हणजे हिच फळ. ते सुकवलेले असतात इथे ओले झाडावर दिसत होते. मग एका चिमुअरड्या पोरीकडून काही जर्दाळू विकत घेतले. ते खात-खात फोटो-सेशन झालं आणि पुढच्या प्रवसाला सुरूवात झाली.
आता आमचा प्रवास झांस्कर नदीच्या किनार्याने प्रवास सुरू झाला.
या रस्त्यावर एक मॅग्नेटिक हिल नवाची जागा आहे. मुख्य रस्त्यावरच ही जागा आहे. रस्त्याला उतार आहे, पण जर गाडी न्युट्रलमध्ये ठेवली तर गाडी चढणीच्या दिशेने जाऊ लागते. खात्री करण्यसाठी आम्ही थोडं अंतर चालूनही बघितलं, चढण त्याच बाजूला होती. गाडी न्युट्रलमध्येच होती. हा एक नैसर्गिक चमत्कारच आहे हे खरं. त्यामागच्या विज्ञानाचा शोध घ्यायला हवा. त्याचा एक व्हिडिओही काढला. एक फोटो सेशन झालं.
आता संध्याकाळ झाली होती आणि लेह पण जवळ येत होतं. मैलाचे दगड दोन अंकी झाले होते. रस्ताही जरा चांगला होता. एक शीखांचा लंगर आहे. उशीर झाला तर इथे मुक्काम करा असा back-up प्लॅन आम्हाला कारगिलच्या सरदारजीने सुचवला होता. सुदैवाने ती वेळ आली नाही. लेह आता ट्प्प्यामध्ये होते आणि पुरेसा वेळही होता. तिथेच एका टेकडीवरून सिंधूनदीच दर्शन होते. सिंधू नदीच हे पहिलं दर्शन. सावरकरांच्या आसेतु-सिंधूपर्यंतच्या हिंदू बांधवांची एक आठवण आली. दिवसभरच्या प्रवासाचा थकवा, संध्याकाळची वेळ, दहा हजार फ़ूट ऊंची आणि घोंघावता वारा, गाडीच्या बाहेर पाय टाकता क्षणीच सगळे थरथरायला लागले. पण उत्साह उलट अजून वाढलाच होता. सिंग इज किंग पोजमधे फोटो सेशन झाले. टीचर अंकलनी पुन्हा आम्हाला हाकायला सुरुवात केली. मग मात्र आम्ही सरळ लेह मधे पोचलो. रात्र झालीच होती. आता जे मिळतय ते घेऊ, नाही बरं वाटलं तर उद्या बदलू असे ठरवून थोडी फोना-फोनी झाल्यावर खान-मंझिल हे हॉटेल नक्की केलं.
आम्ही कुठल्या मुहुर्तावर हा प्लॅन केला होता देव जाणे, आम्ही चेक-इन केलं आणि लाईट गेले.
मेणबत्तीच्या उजेडात जरा सामान पसरलं. आणि मग लडाख फ़िरण्यची व्यवस्था करायला, haggling expert प्रमित आणि आनंद उर्फ बॉस गेले. मग त्यांनी आणलेल्या प्लॅनवर पाच जणांनी पाच बाजूनी चर्चा केली. अंधारातच पुन्हा प्लॅन 7B बदलून 7B-II आखला. तो हॉटेलवाल्याशी नक्की करून जेवायला बाहेर पडलो.
एक बरसं हॉटेल बघून जेवून परतलो अंथरूणांत अंग टाकलं आणि कधी झोप लागली समजलं नाही.
No comments:
Post a Comment